nitin gadkari and sharad pawar

नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar Praised Nitin Gadkari) यांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे. 

    केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या(Nitin Gadkari) कामामुळे सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून त्यांचं नेहमीच कौतुक होत असतं. नगरमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar Praised Nitin Gadkari) यांनीदेखील नितीन गडकरी यांचं कौतुक केलं आहे.  त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करताना आलेला अनुभव देखील पवारांनी यावेळी लोकांना सांगितला. गडकरींच्या काळात देशातील रस्ते दुप्पट(Road Construction Increased In Country) झाल्याचं देखील शरद पवारांनी यावेळी नमूद केलं. नगरमध्ये महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. यावेळी शरद पवार बोलत होते.

    रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, असं सांगतानाच यात गडकरींचा मोलाचा वाटा असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. “गडकरींनी ही जबाबदारी (रस्ते वाहतूक मंत्रालय) घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

    शरद पवार पुढे म्हणाले की, “देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो”.

    दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी इतर राज्यांमध्ये त्यांना येत असलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. “देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे’. त्यामुळे लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.

    दरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधींचा पक्ष न बघता विकासकाम बघतात असं शरद पवार म्हणतात. “संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.