साईबाबा मंदिर खुले करण्याबाबत महसूलमंत्री थोरात म्हणाले…

शिर्डी व परिसराची आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर काही अटी व शर्थींवर सुरु करण्यात यावे.

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिले.

    श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याची मागणी राहाता तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी झालेल्या चर्चेत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले. श्री साईबाबा समाधी मंदिर बंद असल्यामुळे शिर्डी शहरातील सर्व व्यवसाय बंद आहेत. शिर्डीच्या अर्थकारणावर शिर्डी व पिरसरातील वीस ते पंचवीस गावांचे अर्थकारण अवलंबून आहे.

    समाधी मंदिर बंद असल्यामुळे शिर्डी व परिसरातील लोकांची दयनीय अवस्था झालेली असल्याने अनेकांनी स्थलांतर केले आहे. अनेक व्यावसायिकांचे आणि कामगारांचे संसार उध्वस्त झाल्याचे भयावह चित्र शिर्डी व परिसरात निर्माण झालेले आहे.

    शिर्डी व परिसराची आर्थिक घडी पूर्ववत करण्यासाठी श्री साईबाबांचे समाधी मंदिर काही अटी व शर्थींवर सुरु करण्यात यावे. रेल्वे व लोकल प्रवासाच्या धर्तीवर कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या नागरिकांनाच सध्या दर्शनाची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेऊन श्री साईबाबांचे समाधी मंदिर खुले करण्याची आग्रही मागणी करणार असल्याचे कोते म्हणाले.

    मंत्री महोदयांना निवेदन देतेवेळी शिवसेना नेते कमलाकर कोते, राहाता तालुका अध्यक्ष संजय शिंदे, शिर्डी शहर अध्यक्ष संचिन कोते, राहुल गोंदकर, सुनिल बारहाते, अमोल गायके, नितीन शिंदे, साई तनपुरे, सुयोग सावकारे, विश्वजीत बागुल आदी उपस्थित होते.