‘कडेवर’बसण्यावरून रोहित पवार आणि गोपीचंद पडळकरांमध्ये जुंपली; मी कोणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा…

गोपींचद पडळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

अहमदनगर : गोपींचद पडळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. परंतु आता गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. पवार साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कोणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कोणत्या कडेवर आहात, असं सडेतोड उत्तर आमदार रोहित पवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना दिलं आहे. तसंच, आतातरी आपण आहात त्याच ठिकाणी राहिलात तर आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्कीच वाढेल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पुढे म्हणाले की, ‘माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण, या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं २५ वर्षांचा बँकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी, मी विकासाचा ही दीर्घ बॅकलॉग भरून काढण्यासाठी काम करतोय आणि करोना नसता तर, मतदारसंघातील बरेचसे प्रश्न आत्तापर्यंत मार्गी लावले असते. पाच वर्ष याच मतदाससंघातील आमदार राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरावस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला हवा होता,’ असा पलटवार रोहित पवार यांनी केला आहे.

 

गेल्या ५० वर्षांपासून देशाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. पण या मतदारसंघातील रस्त्यांवर खड्ड्यांचं प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सल्ले देत बसू नये, असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी रोहित पवारांना टोला (Criticism ) लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले गोपीचंद पडळकर ?

गोपींचद पडळकरांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. सध्याचे ५० वर्षांपासून नेतृत्व करणारे शरदचंद्र पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात.

रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे. या रहदारीत तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत आणि चांगले करावेत आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत’, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.