दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम ! संपूर्ण शरीराची मोडतोड, हातापायांत सळया असूनही न थकता डॉ.महादेव अरगडेंनी सर केला वासोटा वनदुर्ग

 संगमनेर : शरीराचे दहा ठिकाणी मोडतोड, हातापायांत सळया असतानाही संगमनेरातील प्रसिद्ध स्त्री-रोग तज्ज्ञ तथा आधार फौंडेशनचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे यांनी सातारा जिल्ह्यातील वासोटा वनदुर्ग सर केला आहे. या मोहिमेतून डॉक्टरांनी ‘दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही साध्य करु शकतो’ हा सिद्धांत खरा करुन दाखवत शरीर व मनाने धष्टपुष्ट असणार्‍या तरुणांना लाजवेल असा उत्साह डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. 

 संगमनेर : शरीराचे दहा ठिकाणी मोडतोड, हातापायांत सळया असतानाही संगमनेरातील प्रसिद्ध स्त्री-रोग तज्ज्ञ तथा आधार फौंडेशनचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे यांनी सातारा जिल्ह्यातील वासोटा वनदुर्ग सर केला आहे. या मोहिमेतून डॉक्टरांनी ‘दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही साध्य करु शकतो’ हा सिद्धांत खरा करुन दाखवत शरीर व मनाने धष्टपुष्ट असणार्‍या तरुणांना लाजवेल असा उत्साह डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.

शिवराष्ट्र हायकर्स कोल्हापूर गेल्या २६ वर्षांपासून प्रशांत साळुंखे, शिवव्याख्याते दीपक कर्पे यांचे मार्गदर्शनाखाली गड, किल्ले, दुर्ग अभ्यास सहली आयोजित करते. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीला मिळावा हा उद्देश ठेवण्यात आला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील वासोटा वनदुर्गाची निवड केली. दरम्यान, १३ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात संपूर्ण शरीराची मोडतोड झालेली असताना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आधार फौंडेशनचे शिलेदार सुखदेव इल्हे यांनी सूचवले. त्यावर डॉ.अरगडे, शारदा अरगडे, प्राचार्य किसन दिघे, सविता दिघे या दाम्पत्यांनी तात्काळ होकार दिला. त्यानंतर शिवव्याख्याते प्रा.दीपक कर्पे, संतोष शेळके, अरूण जाधव, उत्तम देशमुख, नंदकुमार रहाणे, विलास शिरोळे यांचेसह सर्व आधार शिलेदार व इतर युवा असे ३८ मावळे संगमनेरहून रवाना झाले. बोलता बोलता राज्यातून तब्बल २५२ मावळे या मोहिमेत सहभागी झाले.

थेट सातार्‍यात पोहोचल्यानंतर ३८ किलोमीटर अंतरावरील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोयना धरणाचा शेवटचा भाग असणार्‍या बामणोली गावातून बोटीने प्रवास सुरू झाला. एक तास बोटीतून सफर केल्यानंतर वासोटा दुर्गच्या पायथ्याशी सर्वजण पोहोचले. वन विभागाच्या नियमांनुसार तपासणी झाल्यावर दुर्ग चढायला सुरूवात झाली. जावळीच्या घनदाट जंगलातून २५० मावळे दुर्गाच्या दिशेने वाटचाल करु लागले. साहजिकच डॉक्टर अरगडे सोबत होतेच. चढायला सुरुवात केल्याबरोबर एक चांगली काठी डॉक्टरांनी आधाराला घेतली. अन् भराभर किल्ला चढू लागले. अर्धा-एक तास झाला. अनेकजण थकलेले, पेंगळलेले व बसलेले दिसू लागले. पण डॉक्टरांचा उत्साह दांडगा होता. ते इतरांना प्रेरणा देत भरभर दुर्ग सर करत होते.

वासोटा दुर्ग हा चढण्यासाठी तसा अवघड आहे. जागीच उंच पायर्‍या तर काही ठिकाणी तीव्र उतार आहे. तर सर्वत्र जावळीचे घनदाट जंगल. इल्हे सर डॉक्टरांना म्हणाले, सर ५० टक्के मोहीम फत्ते झाली. आता थोडे बसूया… थोडा आराम करा. पण आराम करतील ते डॉक्टर कुठले? ते म्हणाले, मी पूर्ण किल्ला चढल्याशिवाय पाणी पिणार नाही अन् काही खाणारही नाही. त्यांचा निश्चय दृढ होता. किमान पाच वर्षे झाले असतील. आधारने हरिश्चंद्रगड, कळसूबाई मोहीम आयोजित केली होती. तेव्हाही न थकता सर्वात पुढे राहत आनंदाने सहपरिवार सहभाग घेत सर्वांना थक्क करून डॉक्टरांनी सोडले होते.

अखेर, रविवार दि.१३ डिसेंबर, २०२० रोजी बरोबर सकाळी ११.३० वाजता मावळे उंचच उंच असणार्‍या वासोटा दुर्गावर पोहोचताच आनंद साजरा केला. दुसर्‍या दिवशी पहाटे ४:३० वाजता सर्वजण यशस्वीरित्या मोहीम फत्ते मरुन घरी पोहोचले. त्यानंतर डॉक्टर दोन दिवस नसल्याने सकाळीच दवाखाना गच्च भरलेला होता. परंतु त्याच ऊर्जेने डॉक्टरांनी आपला रुग्णसेवेचा वसा अखंडपणे चालू ठेवला. या मोहिमेतून डॉक्टरांनी ‘दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही साध्य करु शकतो’ हा सिद्धांत खरा करुन दाखवत शरीर व मनाने धष्टपुष्ट असणार्‍या तरुणांना लाजवेल असा उत्साह डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.