संगमनेरकरांची यंदाची दिवाळी गोड; मंत्री थोरातांची घोषणा

  संगमनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना संकटात दूध उत्पादकांना मदत करण्याऐवजी खाजगीवाले त्यावेळेस गप्प होते. दूध विक्री बंद असताना त्यांनी दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले. अशावेळी राजहंस दूध संघ या उत्पादकांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला. या सहकारी संस्था गोरगरिबांच्या जीवनाशी निगडित आहेत. आपला हेतू प्रामाणिक असून निष्ठेने होत असलेल्या कामामुळे संगमनेरच्या संस्था अग्रगण्य असून राजहंस दूध संघाकडून या वर्षीची दिवाळी सर्वांसाठी गोड होणार असल्याची घोषणा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

  संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. दूध संघाचे चेअरमन व महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,  अ‍ॅड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकराव खेमनर, लक्ष्मणराव कुटे, आर.बी. राहणे, उपाध्यक्ष साहेबराव गडाख, संचालक मोहनराव करंजकर, सुभाष आहेर, भास्करराव सिनारे, विलासराव वर्पे, गंगाधर चव्हाण, अ‍ॅड. बाबासाहेब गायकर, विलास कवडे, संतोष मांडेकर, पांडुरंग सागर, माणिक यादव, राजेंद्र चकोर, प्रतिभा जोंधळे , ताराबाई धुळगंड, कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे यावेळी उपस्थित होते.

  सहकारी संस्थांचा संबंध थेट गोरगरीब माणसाच्या जीवनाशी निगडित आहेत. या संस्था आपण निष्ठापूर्वक जपल्या पाहिजे. दूध संघाने कायम अडचणीच्या काळात उत्पादकांना मदत केली आहे. दूध व्यवसाय हा संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे. कोरोना संकटामध्ये दूध विक्री बंद होती अशा काळात महाविकास आघाडी सरकारने धाडसी निर्णय घेत दहा लाख लिटर दुधाची भुुकटी करण्याचा निर्णय घेतला. यातून उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.

  राजहंस दूध संघाने या काळात १८०० मेट्रिक टनाची दूध पावडर बनवली होती. परंतु दूध पावडरचे दर हे नियमित नाहीत. दूध व पावडर हे नाशवंत आहेत. त्यामुळे याबाबत अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. अत्यंत काटकसरीतून हा दूध संघ शेतकºयांच्या पाठिशी उभा राहिला असल्याचे मंत्री थोरात यांनी सागिंतले.

  अडचणीमध्ये सहकारी संस्था साथ देतात. मात्र अशा काळात खाजगीवाले पळ काढतात. दूध संघाची आर्थिक स्थिती मजबूत असून दूध संघाकडून दिवाळीच्या काळामध्ये रिबीट जाहीर केले जाणार आहे. यंदाची दिवाळी सर्व दूध उत्पादक व कामगार यांच्यासाठी  गोड होणार आहे.

  – बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री.