प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराजी; भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षांचा राजीनामा

    पाथर्डी : बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे तालुक्यातील मुंडे समर्थक नाराज झाले असून, या प्रकारामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनी आपल्या पदाचा राजीनामा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम यांच्याकडे पाठवला आहे.

    दोन दिवसात मुंडे समर्थकांची बैठक

    पाथर्डी तालुका आणि मुंडे यांचे सख्य संपूर्ण राज्याला परिचित आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी परळी माझी आई तर पाथर्डी माझी मावशी आहे. असे जाहीरपणे सांगितले होते. तशाच पद्धतीने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे सुद्धा पाथर्डीवर प्रेम आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शेवगावपाथर्डी मतदारसंघात आहे.
    नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. याचाच परिणाम म्हणून समर्थक राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजते. अमोल गर्जे पंकजा मुंडे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. येत्या दोन दिवसात मुंडे समर्थक बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीही आपले राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठवले आहेत.