खासदारांशी ऑनलाईन संवाद साधताना पद्मश्री 
 राहीबाई पोपेरे
खासदारांशी ऑनलाईन संवाद साधताना पद्मश्री राहीबाई पोपेरे

अकोले (जि.नगर) तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आज संसदेतील खासदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभ्या करण्याची कळकळीने आवाहन केले.

  • राहीबाईंनी साधला देशातील खासदारांशी संवाद

अकोले (Akole).  अकोले (जि.नगर) तालुक्यातील बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आज संसदेतील खासदारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभ्या करण्याची कळकळीने आवाहन केले.

राहीबाई यांनी आज देशातील खासदारांशी हर्च्युअल पद्धतीने ऑनलाईन संवाद साधताना महत्त्वपूर्ण गोष्टींना साद घातली. आपल्या देशामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी व शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभा राहिल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील; परंतु माझ्या शेतकरी राजासाठी भरवशाचे आणि शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात अशी भावनिक साद सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी आपल्या प्रबोधन पर भाषणात आज घातली.

आपला भारत देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपारिक बियाण्यांपासून तयार केलेल्या भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण जनतेकडे भरपूर ज्ञान आणि विद्वत्ता उपलब्ध असून बायफ संस्थेने जसा माझा शोध घेतला व मला मदत केली त्याच प्रमाणे शासनाने ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून त्यावर काम केले पाहिजे. असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी व शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत व त्यासाठी मी माझे जीवन समर्पित केलेले आहे .मी माझ्या जीवनात एकमेव ध्येय ठेवलेले आहे आणि ते म्हणजे गावरान बियाणे संवर्धन व आपल्या मातीशी इमान राखणे होय.

यांसोबतच ग्रामीण भागातील रस्ते ,पाणी ,वीज या प्रश्नांनाही राही बाईंनी अलगद हात घातला व लोकसभा सदस्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये गरिबातील गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचे भावनिक आवाहन केले.आपला जीवन प्रवास उलगडून सांगताना आपले बालपण अत्यंत हलाखीत आणि गरिबीत गेले .परंतु आपल्या वडिलांनी आईच्या मागे आमचे पालनपोषण करून मौलिक विचारांचा ठेवा आम्हाला दिला. आम्ही लहान असतानाच आमची आई आम्हाला सोडून देवाघरी गेली .त्यानंतर आमच्या वडिलांनीच आमचा सांभाळ केला आम्ही एकूण आठ भाऊ-बहीण आहोत. त्यात मी चौथ्या नंबरला आहे. बालपणातच कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्यानंतर मला इच्छा असूनही शाळा शिकता आली नाही .परंतु मी निसर्गाच्या शाळेत भरपूर शिकले आणि निसर्गानेच मला खरे आणि टिकाऊ शिक्षण दिले. तसेच ग्रामीण आणि आदिवासी भागात अत्यंत खडतर जीवन जगताना अनेक गोष्टींची समाज बालवयातच होत गेली .माझा विवाह लवकरच म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी झाला. मला एकूण चार अपत्ये आहेत चारही मुलांची लग्न झालेली आहेत.

त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीतून मी बऱ्यापैकी बाहेर पडलेली असून या पुढील आयुष्य हे समाजासाठी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी जगायचे आहे. त्यासाठी मी कटिबद्ध आहे .गावोगावी जाऊन तरुण विद्यार्थ्यांची भेट घेणे व त्यांना जैवविविधतेची माहिती देणे तसेच पुढील पिढीला हा मौलिक ठेवा काय आहे व त्याच्या जतन कसे करायचे याबद्दल मी माहिती देत असते. मी शाळेत जाऊ शकले नाही परंतु शाळा माझ्याकडे येते याचा मला सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कोंभाळणे सारख्या आदिवासी आणि छोट्याशा गावातून सुरू केलेली देशी वाण व बीज संवर्धनाची चळवळ देशव्यापी बनवण्यासाठी त्यांनी संसदेतील सर्व खासदारांना विनम्र आवाहन केले. बायफचे विषय तज्ञ श्री.संजय पाटील यांनी बायफ संस्थेतर्फे होत असलेले बायोडायव्हर्सिटी कंजर्वेशन संदर्भातील काम व त्याची व्याप्ती उपस्थितांसमोर मांडली .शासनाकडून प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने कार्य सुरू करण्यासाठी बायफची तज्ञ टीम शासनास मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या मार्गदर्शनपर सत्रामध्ये स्थानिक बीज संवर्धन या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.