शिर्डीत पहिल्या फ्लाईटचे लँडिंग; १६८ भक्त विमानातून साई दरबारी

कोरोना काळात बंद असलेली शिर्डीतील विमानसेवा (Shirdi Airport Open) आजपासून सुरु झाली असून, चेन्नईहून आलेल्या १६८ भक्तांनी आज साई दरबारी हजेरी लावली.

    शिर्डी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना काळात बंद असलेली शिर्डीतील विमानसेवा (Shirdi Airport Open) आजपासून सुरु झाली असून, चेन्नईहून आलेल्या १६८ भक्तांनी आज साई दरबारी हजेरी लावली. या साईभक्तांचे काकडी ग्रामस्थ आणि काकडी विमानतळ टॅक्सी युनियनच्या वतीने शाल आणि पेढे देऊन स्वागत करण्यात आले.

    गेल्या काही दिवसांपासून साईंच्या दर्शनाची इच्छा होती. मात्र, मंदिर बंद आणि विमानसेवाही बंद असल्याने येणे शक्य नव्हते. आता मंदिर सुरू झाले आणि विमान सेवाही सुरू झाली. त्यामुळे साई दरबारी आल्याचा आनंद झाल्याची प्रतिक्रिया साई भक्त विमान प्रवाशाने दिली.

    चेन्नईहून १६८ साईभक्त प्रवासी घेऊन आलेले विमान साडेतीन वाजेच्या सुमारास शिर्डी विमानतळावर लँड झाले. तर याच विमानातून ३८ साईभक्त शिर्डीहून चेन्नईकडे परतले.

    शाल देऊन पेढे भरवून स्वागत

    विमानतळ बंद असल्याने काकडीतील सुमारे २७५ पेक्षा अधिक टॅक्सी बंद होत्या. त्यामुळे कर्ज काढून टॅक्सी घेतलेल्या मालकांची आर्थिक अडचण होत होती. मात्र, आता विमानतळ सुरु झाल्याने आज पहिल्याच विमानात आलेल्या भाविकांचे शिर्डी एअरपोर्ट टॅक्सी युनियन आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या शाल देऊन पेढे भरवून स्वागत करण्यात आले.