Shiv Sena Women's Front warns Trupti Desai

शिर्डी : तृप्ती देसाई यांनी साईमंदीरातील ड्रेस कोड प्रकरणी शिर्डीत येवून काही स्टंटबाजी केली तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा व शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा शिवसेना महिला आघाडीने दिला आहे.

साईसंस्थानने मंदीरात दर्शनासाठी येतांना भाविकांनी भारतीय पेहरावात येण्याच्या केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतांना भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येवून फलक काढण्याचा इशारा दिला आहे. यावर शिर्डीतील महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला आहे.

महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जगताप यांनी साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना या निर्णयाबद्दल धन्यवाद दिले. पेहरावाबाबत संस्थानने विनंती केलेली आहे. सक्ती केलेली नाही या मुद्दयाकडे लक्ष वेधत जगताप यांनी महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात असा सवाल केला.

सोहळे घालून पंचाने अंग झाकणाऱ्या पुजाऱ्यांना अर्धनग्न म्हणणाऱ्या देसाईच संस्कृतीबद्दलच ज्ञानच अर्धवट असल्याचे दिसते. भारतीय संस्कृतीत हजारो वर्षात यावर कुणीही आक्षेप घेतलेला नाही. त्यांच्या या वक्तव्याची सुसंस्कारीत समाज गंभीर दखल घेईलच पण देसाईंनी स्टंटबाजी करण्यासाठी शिर्डीत प्रवेश केला तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवण्याचा इशारा जगताप यांनी दिला.

यावर शिवसेनेच्या महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी सांगितले की, देसाईंनी दर्शनाला याव आम्ही त्यांच स्वागत करू, मात्र फलक काढण्याची स्टंटबाजी केली तर सेना स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळे फासु.

येथील ग्रामस्थांच्या वतीने बोलतांना सुरेखा वैद्य-रणमाळे म्हणाल्या की, येथे विदेशी भाविक येतात, तेही भारतीय पोषाख घालतात व आपल्या देशातीलच काहीजण अर्ध्या कपड्यात येतात ही आपली संस्कृती नाही. ज्यांना असे कपडे घालण्याची हौस आहे त्यांनी तशा पर्यटनस्थळी जावे. महिलांच्या बाबतीत चांगल्या निर्णयावर महिलेनेच आक्षेप घेणे योग्य नाही. त्यांनी इथे काही करण्याचा प्रयत्न केला तर ग्रामस्थ महिला स्वस्थ बसणार नाहीत.