धक्कादायक ! कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृतदेह बिलाअभावी अडवून ठेवला ; चर्मकार विकास महासंघाची पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे तक्रार

मृतदेहावर अंत्यविधी लवकर होण्यासाठी मृतदेह मनपा प्रशासनाच्या ताब्यात देण्याची हॉस्पिटल प्रशासनाला त्यांच्या कुटुंबीयांनी विनंती केली. मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाचे बील पुर्ण भरण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धमकावून दमबाजी केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. साईदीप हॉस्पिटलने शासनाच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन केले आहे. गोरगरीब जनतेला योग्य उपचार न देता फक्त व्यवसाय म्हणून लूट सुरू केली आहे.

    अहमदनगर: मृत झालेल्या कोरोना रुग्णाचा मृतदेह बीलाअभावी बारा तास अडवून ताटकळत ठेऊन त्याची अवहेलना करुन, नातेवाईकांना पैश्यासाठी मानसिक त्रास देत धमकाविल्याप्रकरणी शहरातील साईदीप हॉस्पिटलवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना देखील देण्यात आले.

    – हॉस्पिटल वर कारवाईची केली मागणी
    कल्पना चंद्रकांत जगताप कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना उपचारासाठी १३ मार्च रोजी साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार योग्य पद्धतीने न मिळाल्याने २७ मार्च रोजी कल्पना जगताप यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबाला सदर रुग्णांच्या वेळोवेळी प्रकृतीच्या संदर्भात माहिती न देता अंधारात ठेवण्यात आले. रुग्णांच्या नातेवाईकांना उपचारासाठी किती खर्च येईल? याची माहिती न देताच वेळोवेळी पैशाची मागणी करून पैसे जमा करण्यात आले. जवळ जवळ तीन लाखांच्या आसपास बिल वसूल करण्यात आले आहे.साईदीप हॉस्पिटलला कोरोना वार्डमध्ये रुग्णांना जेवण देण्यासाठी कोणत्याही सुरक्षेविना कुटुंबातील सदस्यांना पाठविण्यात आले.यामुळे कुटुंबातील इतर सदस्यही कोरोना रुग्णांच्या संपर्कात येऊन पॉझिटिव्ह झाले. याला साईदीप हॉस्पिटल प्रशासन जबाबदार आहे. कल्पना जगताप यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असता, पुर्ण बील न भरल्याने त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला नाही.

    -शासनाच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन
    सदर मृतदेहावर अंत्यविधी लवकर होण्यासाठी मृतदेह मनपा प्रशासनाच्या ताब्यात देण्याची हॉस्पिटल प्रशासनाला त्यांच्या कुटुंबीयांनी विनंती केली. मात्र हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाचे बील पुर्ण भरण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना धमकावून दमबाजी केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. साईदीप हॉस्पिटलने शासनाच्या आदेशाचे नियमांचे उल्लंघन केले आहे. गोरगरीब जनतेला योग्य उपचार न देता फक्त व्यवसाय म्हणून लूट सुरू केली आहे.आपत्कालीन परिस्थितीत जनतेला चांगले उपचार देऊन आधार देण्याऐवजी जास्तीचे बिले आकारून त्यांना कर्जबाजारी करुन लुटण्याचे काम सुरु असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.शासन आदेशाच्या नियमांचे उल्लंघन करुन साईदीप हॉस्पिटलचे कामकाज सुरु असून,त्यांच्या कारभाराची व जास्तीच्या बीलांचे ऑडिट करून हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.