केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ‘ज्ञानेश्वर’चा सन्मान

    नेवासा : तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले-पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२१ अखेर जीएसटी कर प्रणालीत नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केली. त्याबद्दल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान केला आहे.

    केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजित कुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले-पाटील यांनी दिली. केंद्र शासनाने २०१७ पासून जीएसटी कर प्रणाली लागू केली. तेव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने अत्यंत तत्परतेने व नियमित जीएसटी भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला सर्टिफिकेट ऑफ अप्रेसिएशन प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान केला आहे.

    नियमित जीएसटी वेळेत भरणा करण्यासाठी लेखापाल शैलेंद्र जैस्वाल, कारखान्याचे सीनिअर अकाउंटंट नामदेव शिंदे व असिस्टंट अकाउंटंट रमेश शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.