सभ्य कपडे घालूनच मंदिरात प्रवेश करा, भूमिकेवर ठाम राहत साई संस्थानाने झळकावले फलक, तृप्ती देसाईंच्या भूमिकेकडे लक्ष

मंदिर परिसरात येताना भाविकांनी सभ्य कपडे घालावेत आणि मंदिराचे पावित्र्य भंग होणार नाही, अशा सूचना देणारे फलकच आता शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात उभे करण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. “आपण पवित्र जागेत प्रवेश करत आहात. आपण भारतीय संस्कृतीस अनुसरून अथवा सभ्यतापूर्ण वेशभुषा परिधान करावा, ही विनंती”, असं या फलकावर लिहिण्यात आलंय.

मंदिराच्या परिसरात येताना भाविकांनी सभ्य कपडे घालून यावेत, अशा सूचना देणारे फलक साई संस्थानानं मंदिर परिसरात उभे केले आहेत. साई संस्थानाच्या या निर्णयावरून सध्या देशभरात उलटसुलट चर्चा सुरू असताना आता मंदिर प्रशासनाने बोर्ड लावल्यामुळे नव्या चर्चेला उधाण आलंय.

मंदिर परिसरात येताना भाविकांनी सभ्य कपडे घालावेत आणि मंदिराचे पावित्र्य भंग होणार नाही, अशा सूचना देणारे फलकच आता शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरात उभे करण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून भाविकांना सूचना देण्यात आल्या आहेत. “आपण पवित्र जागेत प्रवेश करत आहात. आपण भारतीय संस्कृतीस अनुसरून अथवा सभ्यतापूर्ण वेशभुषा परिधान करावा, ही विनंती”, असं या फलकावर लिहिण्यात आलंय.

भक्तांनी सभ्य पोषाख धारण करावा, या साई संस्थानाच्या सूचनांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतलाय. ही सक्ती फक्त भक्तांनाच का, पुजाऱ्यांना का नाही? असा सवाल त्यांनी साई संस्थानाला विचारला आहे.

भक्तांना विशिष्ट कपड्यांसाठी सक्ती करणं हा राज्यघटनेनं दिलेल्या मुलभूत अधिकारांचा भंग असल्याचं देसाईंचं म्हणणं आहे. कुणी कुठले कपडे घालावेत, हे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे साई संस्थानाने भक्तांच्या अधिकारांवर अतिक्रमण करू नये, असंही त्यांनी म्हटलंय.

अनेक पुजारी अर्धनग्न अवस्थेत मंदिरात फिरत असतात. त्यांच्यावर कधीही कुठल्या भक्तांनी आक्षेप घेतलेला नाही. मग भक्तांच्या पोषाख स्वातंत्र्यावरच आक्षेप का, असा सवाल देसाई यांनी केलाय. शिर्डी संस्थानानं हा आदेश मागे घेतला नाही, तर आंदोलनाचा इशारा तृप्ती देसाईंनी दिलाय.