मुंबईतील साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी : स्नेहलता कोल्हे

    कोपरगाव : मुंबईतील साकिनाका येथे घडलेली घटना सुन्न करणारी आहे. एका भगिनीवर काही विकृत प्रवृत्तींनी अत्याचार केला तिची प्राणज्योत मालवली आहे. निधन झालेल्या त्या पीडित भगिणीबद्दल शोक व्यक्त करण्यासाठीही शब्द अपुरे आहेत. अत्याचार करणाऱ्या नीच प्रवृत्तीचा समस्त महिला भगिनींच्या वतीने आपण निषेध व्यक्त करते, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.

    स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, अमरावतीत बलात्कार, पुणे, पिंपरी, कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी कोविड सेंटरमध्येही महिला कर्मचारी व महिला रुग्ण सुरक्षित नव्हत्या. त्यावेळीही अनेक दुर्दैवी प्रकार समोर आले होते. अशा घटना या महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का लावणार्‍या आहेत. माणुसकीला काळीमा फासणार्‍या अशाच या सर्व घटना आहेत. साकिनाकाच्या निर्भयाने आज प्राण सोडले. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. यापुढे महिलांनी घराबाहेर पडावे की नाही अशी अवस्था अलीकडे बघायला मिळते आहे. सुरक्षिततेची भावना महिलांना राहिली नाही याचे मुख्य कारण म्हणजे अशा विकृत प्रवृत्ती समाजात उच्छाद घालतात व त्यांना प्रतिबंध करण्यासाठी व्यवस्था तोकडी ठरते आहे.

    छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा असलेला आपला महाराष्ट्र आहे असे आपण गौरवाने सांगतो मात्र या महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन कारभार करणे शासनाला अडचणीचे वाटते की काय अशी स्थिती राज्य सरकारचे वर्तन पाहून वाटते आहे.ठाणे येथील महिला अधिकाऱ्यांची बोटे तोडण्याचा प्रकारही दुर्दैवी असून शासनाने गंभीर होणे आवश्यक आहे.

    शक्ती कायद्यावर नुसत्या बैठकांचे सत्र सुरू आहे असे असले तरी विद्यमान कायद्यात सुद्धा कठोर तरतुदी आहेत.स्वत: मा.मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घ्यावी आणि जलदगती न्यायालयाची मागणी करावी. महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करायला सरकारला वेळ नाही, अशा घटना वारंवार होत असतील तर कायद्याचा धाकही राहत नाही आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामुळे तात्काळ कठोर पावले उचलत आरोपींना शासन करून कडक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे.