पावसामुळे सोयाबीन व उडीद पिकांचे नुकसान

    जामखेड : गेल्या दहा दिवसांपासून घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणी सोयाबीन व उडीद पीके पाण्यात गेल्याने आता सडून चालली आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    जून महिन्यात थोड्याफार ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या थोड्याफार पावसावर कशीबशी पीके आली. सोयाबीन व उडीद पिकांना चांगल्या शेंगा लागल्या होत्या. सध्या उडीद पिकांचा हंगाम संपत आला आहे. मात्र, मागील दहा दिवसांपासून सततच्या पावसामुळे पिक पाण्यात आहे. पिक पाण्यामुळे सडून चालले आहे. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीन पिकाला आणखी पंधरा दिवस वेळ आहे. पण पिक सध्या पाण्यात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.

    वाढत्या बियाणांच्या किंमती, खतांचे चढे भाव वाढती महागाई या परिस्थितीत बळीराजाने काळ्या आईची ओटी भरली पिके बरी दिसत आसतानाच आता अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अनियमित पणामुळे हिरावून घेतला आहे. सध्या उडीद व सोयाबीन पिकाला चांगला बाजारभाव आहे. पण अति पावसामुळे पिक शेतातच सडून चालले आहे.

    अनेक ठिकाणी काढून ठेवलेल्या पिकाला कोंब फुटलेले आहेत. तर काही ठिकाणी पिके सडून चाललेली आहेत. साकत, सावरगाव, दिघोळ, जातेगाव, देवदैठण, नायगाव, नाहुली, मोहा या परिसरात उडीद व सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.