खिरविरे येथील ‘कल्पतरू स्वयंम सहाय्यता समूहा’स राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अकोले : तालुक्यातील खिरविरे येथील कल्पतरू स्वयंम सहाय्यता समूहाला बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा  विजयाताई देशमुख उत्कृष्ट स्वयंसमहाय्यता समुह २०२० हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 

अकोले : तालुक्यातील खिरविरे येथील कल्पतरू स्वयंम सहाय्यता समूहाला बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा मानाचा  विजयाताई देशमुख उत्कृष्ट स्वयंसमहाय्यता समुह २०२० हा पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

राज्यभरातील उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा योग्य तो सन्मान व्हावा व बचत गटांना ग्रामीण भागाच्या विकासामध्ये समाविष्ट करताना नवीन दिशा व उभारी मिळावी या उद्देशाने या पुरस्काराचे दरवर्षी वितरण केले जाते .चालू वर्षांमध्ये अकोले तालुक्यातील बायफ संचलीत व जनरल मिल्स पुरस्कृत आदिवासी विकास कार्यक्रमांतर्गत वर्ष २०१२मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या कल्पतरू स्वयंसहाय्यता समूहास पुरस्कार जाहीर झाला आहे. या समूहामध्ये एकूण बारा सदस्य असून सर्व सदस्य आदिवासी आणि खिरविरे गाव आणि परिसरातील आहेत .

रोजगाराची संधी ग्रामपातळीवर निर्माण करताना बायफ च्या मदतीने या समूहाने सेंद्रिय शेती ,भाजीपाला लागवड, सुधारित पद्धतीने गोपालन, जलस्रोत विकास ,स्वच्छ स्वयंपाक गृहनिर्मिती, परसबाग लागवड ,कुकुट पालन ,जलसंधारण इत्यादी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत ग्राम विकासाच्या दृष्टीने व वैयक्तिक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या समूहाची एकूण ९२ हजार रुपये बचत झालेली असून बँकेला हा समूह लिंक केला गेलेला आहे . तसेच पंचायत समिती अकोले येथे हा समूह रजिस्टर करण्यात आलेला आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून या समूहाला 90 हजार रुपयाचे कर्ज उपलब्ध झाले होते त्याची सव्याज परतफेड या समूहाने केलेली आहे .या कर्जाऊ रकमेतून समूहाने दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी उच्च प्रतीच्या म्हशी आणि गाई, शेळ्या व कुक्कुटपालन व्यवसाय समूहातील प्रत्येक सदस्याकडे राबवलेला आहे.

या समूहाचे अध्यक्ष म्हणून तान्हाबाई तुकाराम डगळे या काम बघत आहेत तर भारती पंढरीनाथ पोटे सचिव म्हणून कार्यरत आहेत .हिराबाई पोटे ,चंद्रभागा डगळे, रोहिणी डगळे ,यमुनाबाई  डगळे,पूजा पोटे ,मुक्ता डगळे,रुक्मिणी डगळे, मंगलाबाई डगळे, विमल  भारमल, कविता डगळे या महिला सदस्य म्हणून समूहात कार्यरत आहेत. समूहाला बायफ च्या केंद्र समन्वयक श्रीमती लीला कुऱ्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच प्रकल्पातील इतर सहकारी राम कोतवाल, योगेश नवले, राम भांगरे ,खंडू भांगरे यांचेही मार्गदर्शन आणि मदत या समूहाला मिळालेले आहे. समूहाला मिळालेल्या यशाबद्दल बायफ चे रिजनल डायरेक्टर श्री. व्ही .बी. द्यासा , राज्य समन्वयक सुधीर वागळे ,अतिरिक्त राज्य समन्वयक श्री प्रदीप खोशे या मान्यवरांनी कल्पतरू समुहाचे अभिनंदन केले आहे.

अभिमानास्पद! एकाच तालुक्यातील चार समूहांना पुरस्कार प्राप्त होण्याची पहिलीच वेळ

यापूर्वी तालुक्यातील तीन समूहांना विजयाताई देशमुख राज्यस्तरीय उत्कृष्ट स्वयंम सहाय्यता समूहाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. एकाच तालुक्यातील चार समूहांना हा पुरस्कार प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बायफ च्या मदतीने महिला विकासाचे मोठे कार्य आदिवासी भागात उभारले गेले आहे. त्यातून महिलांना आपले कार्यकर्तृत्व सिद्ध करण्याची चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्वयंसहायता समूहाच्या माध्यमांनीच पद्मश्री .राहीबाई पोपेरे- सीड मदर तसेच सौ .ममताबाई भांगरे फूड  मदर, सोनाबाई भांगरे- वॉटर मदर, हिराबाई भांगरे -धान माता अशी विविध क्षेत्रात नाव कमावणाऱ्या गुणवान महिला जगासमोर आलेल्या आहेत.