वीज कनेक्शन तोडणे थांबवा अन्यथा…; शिर्डीतील चार नगरसेवकांचा ‘महावितरण’ला इशारा

    शिर्डी : वर्षानुवर्षे वीज वितरण कंपनीला कोट्यवधीचा महसूल देणाऱ्या साईनगरीवर सध्या कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या काळात थोडं सांभाळून घेण्याऐवजी कंपनीने वीज जोडण्या-तोडण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. कंपनीने वीज तोडणी कारवाया तात्काळ थांबवाव्या अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा शिर्डीतील चार नगरसेवकांनी दिला आहे.

    जगन्नाथ सुर्यभान गोंदकर, छाया पोपट शिंदे, अंजली रविंद्र गोंदकर व रविंद्र विलास कोते अशी या नगरसेवकांची नावे आहेत. शहराच्या विविध भागात वीज जोडणी तोडण्याच्या कंपनीच्या कारवाईवर या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. या नगरसेवकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. यात म्हटले आहे की, शहरात वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तत्काळ थांबवावी, सध्या सर्व शिर्डीकर आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत. साई मंदिर अजूनही भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे रोजगारही पूर्णपणे बंद आहे.

    आजवर शिर्डीकरांनी प्रामाणिकपणाने लाईट बिल भरण्यास सहकार्य केले आहे. सध्या कोविडमुळे मात्र नागरिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. शिर्डीकरांचा सर्व व्यवसाय हा साईमंदिरावर अवलंबून आहे. व्यवसाय नसल्याने नागरिकांना दोन वेळच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यातच वीज बिलापोटी वीज कनेक्शन बंद करण्यात येत आहे. ही कारवाई तत्काळ थांबवण्यात यावी. मंदिर चालू झाल्यानंतर नागरिक वीज बिल भरणारच आहेत. वीज तोडणी तत्काळ थांबवली नाहीतर उपोषणास बसण्याचा निर्णय या नगरसेवकांनी घेतला आहे.

    या संदर्भातील निवेदनाच्या प्रती ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व वीज वितरण कपंनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.