महसूल विभागातील महिला अधिकाऱ्याचा सुसाईड ऑडिओ व्हायरल; जिल्ह्यात खळबळ

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : आत्महत्या केलेल्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना उद्देशून असलेला महसूल महिला अधिकाऱ्याचा सुसाईड ऑडिओ व्हायरल झाल्याने नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यात कोणाचा उल्लेख नसला तरी त्यांचा रोख जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका आमदाराकडे असल्याचे स्पष्ट जाणवते आहे.

  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात हा ऑडिओ बॉम्ब पडल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे राठोड यांच्यासारखेच नगरचे हे आमदार महाशयही अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधींचे लांगलूचालन करता येत नाही, त्यामुळे ते मोर्चे, उपोषणं, आंदोलने करायला लावतात. त्यावर नाही भागलं तर विधिमंडळात तारांकित पश्न आणि अ‍ॅट्रॉसिटीचा प्रयोग करतात. त्यांच्या विरोधात लढण्यासाठी शक्तीच राहिली नाही. वरिष्ठांना सांगितलं, पण त्यांनी सहाय्यक करण्याऐवजी मारेकरी पाठविले असा उल्लेख त्या महिला अधिकाऱ्याने सुसाईड ऑडिओत केला आहे.

  काय म्हटलंय त्यात…

  प्रिय, दीपाली चव्हाण घाबरू नकोस, मीही लवकरच येते तुझ्या वाटेवर तुझ्या सोबत..अशी सुरूवात असलेल्या या ऑडिओ क्लीपमध्ये,’ किती जणांना धडा शिकवायाचा, या चिमुकल्या पंखात आता तेवढं त्राण राहिलं नाही. तत्वांना मुरड घालून जगता येत नाही आणि जी हुजूर म्हणून तळवे चाटता येत नाही. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही अन् त्यांनी थुंकलेलं मला चाटता येत नाही. उकिरड्यावर उगवाव्यात तशा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत सहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी व आपण एक रथ दोन चाकं. पण आपल्या चाकानं जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा. कारण मागे राहणं हेच मनूनं शिकवलं.

  सगळे मनूचे अनुययी, मग एकटीने वाट कशी चालणार पुढे पुढे, दीड शहाणी, आगाऊ, भ्रष्ट अशा विशेषणाच्या मखरात कोंबणार, नाक दाबून ठेवणार, जोपर्यंत विनवणी करणार नाही तोपर्यंत आपल्या विरोधात उपोषणांना बसविणार, स्त्री जातीचा उजेड सहनच होत नाही त्यांना. नुसत्या उपोषणाने नाही भागत तर मग एलएक्यू करायचा. घोडखिंडीत गाठयाचे. जुन्या पुराण्या चुका उकरून काढयाच्या. त्यावर नाही भागलं तर अ‍ॅट्रॉसिटीचा धाक, मोर्चे, आंदोलने, उपोषणं, चौकशी समिती, इतकंच काय तर वरिष्ठांना सांगून हवा तसा रिपोर्ट बनवून घेणे, इतक्या जात्यात दळण होतय. त्यातून उसळी घ्यायला इतकी मोठी ताकद कुठे आहे. इतकं मोठ पद तितकी मोठी जबाबदारी. मग एखादी चूक होऊ शकते, महिलेला माफी नाही कारण अहिलेलाही नव्हती.

  ज्योती आणि आजोबा..!

  घाई करते असं जरा वाटते, पण मी जरा कायद्याच्या मार्गानेही जावून पाहिले. खंडणी मागणाºयावर गुन्हा दाखल करून पाहिला. वाटलं, मला म्हणतील, ओ शेट तुम्ही नादच केला थेट, अशा थाटात अधिकारी वर्ग जंगी स्वागत करतील, पण छे कॅमेरे बसविलेले असताना कोण रिस्क घेणार. शिवाय शेठ हे फक्त पुरूषांना म्हणतात, बायांना कुठेशेट म्हणतात.

  लहानपणापासून ध्येयाच्या वाटेवर चालताना अगणितवेळा रक्ताळलेले पाय होते, पण तेव्हा आजोबा होते, अलगद बोटाला धरून हळूच वर काढयाचे. पुरानातले दाखले द्यायचे आणि म्हणायचे, हे बघ पोथ्या वाचून तूझं नाव ज्योती ठेवलं. डगमगायाचं नाही कधी, असं म्हणून ज्योतीवर आलेली काजळी हळूच फुकुंन टाकयाचे. त्यांच्या उबदार स्पर्शात हरविलेली मी पुन्हा जिद्दीने वाट चालू लागयाची. पण आजोबा गेले आणि आता तसं कोणी उरलंही नाही.