कोरोनाग्रस्त तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; नेवासातील कोविड सेंटरमधील घटना

भेंडा येथील ३ मजली नागेबाबा भक्तनिवास मध्ये शासकीय कोविड केअर सेंटर सुरू आहे.याठिकाणी सुमारे २०० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.या कोविड सेंटर मधील तिसऱ्या मजल्यावरील कॉफरन्स हॉल मध्ये ४० रुग्ण ऍडमिट आहेत. मयत गणेश हा दि.१८ एप्रिल रोजी या कोविड सेंटर मध्ये ऍडमिट झाला होता. त्याची आई सुद्धा येथेच ऍडमिट होती.गणेशची आई व इतर सर्व रुग्ण दुपारी १२ वाजता जेवणासाठी खाली गेले, मात्र गणेश एकटाच मागे थांबून राहिला.इतर सर्वजण जेवण करून आपापल्या बेडवर परतले.

    नेवासा : नेवासा खुर्द येथील गणेश दिनकर करांडे (वय ४० वर्षे) या कोरोनाग्रस्त तरुणाने भेंडा येथील शासकीय कोविड केअर सेंटर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि.२१ एप्रिल रोजी दुपारी घडली.

    याबाबत अधिक माहिती अशी की,भेंडा येथील ३ मजली नागेबाबा भक्तनिवास मध्ये शासकीय कोविड केअर सेंटर सुरू आहे.याठिकाणी सुमारे २०० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.या कोविड सेंटर मधील तिसऱ्या मजल्यावरील कॉफरन्स हॉल मध्ये ४० रुग्ण ऍडमिट आहेत. मयत गणेश हा दि.१८ एप्रिल रोजी या कोविड सेंटर मध्ये ऍडमिट झाला होता. त्याची आई सुद्धा येथेच ऍडमिट होती.गणेशची आई व इतर सर्व रुग्ण दुपारी १२ वाजता जेवणासाठी खाली गेले, मात्र गणेश एकटाच मागे थांबून राहिला.इतर सर्वजण जेवण करून आपापल्या बेडवर परतले.बराच वेळ झाला कोणी तरी तासाभरापासून बाथरूम मध्ये गेला आहे,तो बाहेरच येत नाही,आम्हाला पण बाथरूमला जायचे आहे अशी तक्रार इतर रुग्णांनी केल्यावर दुपारी १:४० वाजता सफाई कामगाराने बाथरूमचा दरवाजा वाजवला परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने सफाई कामगाराने वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले.त्यानंतर बाथरूमचा दरवाजा तोडला असता गेस्ट रूम कम बाथरूम असलेल्या खोल्याचा छताला असलेल्या पंख्याला महिला वापरता स्टॉल स्वरूपाच्या कापड बांधून गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची निदर्शनास आले.

    घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश साळुंके,पोलिस निरीक्षक विजय करे,सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर,उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले.पंचनामा करून मृतदेहाचे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नेवासा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आला.

    मयत गणेश करांडे हा दररोज नेवासा येथून येऊन भेंडा परिसरात दारोदार फिरून बेकरी उत्पादने विक्रीचा व्यवसाय करत होता. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई असा परिवार आहे.