बाळ बोठेच्या  खिशात सापडली सुसाईड नोट; बोठेची तुरुंगात बडदास्त होत असल्याचा आरोप करत जरेपुत्राचा आत्मदहनाचा इशारा

बोठे याला पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

    अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडचे अध्यक्षा, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बोठे याला अहमदनगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक करण्यात आली. ते ज्या रूममध्ये थांबले होते त्या रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते, अशी माहिती अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    बोठे याला पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली होती. त्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करणार असल्याचा उल्लेख होता. तसेच नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास कोणाला संपर्क करावा, यासंदर्भातील माहिती सुसाईड नोटमध्ये देण्यात आली होती, असे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

    आरोपीने पोलिस आणि कायद्यापासून बचावाचा पुरेपुर प्रयत्न केल्याचे आढळून आले. इकडे मालमत्ता जप्तीची कारवाई अंतिम टप्प्यात आलेली असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याने राचकोंडा पोलिस आयुक्त कार्यालयात आपण गेल्याचे दाखवून देण्यासाठी तेथे जाऊन केवळ नोंद केली, मात्र आतमध्ये न जाता निघून गेला. तेथे मूळचे नगर जिल्ह्यातील महेश भागवत पोलिस आयुक्त आहेत. मात्र, त्यांची भेट घेतली नाही. केवळ तेथे गेल्याचे भासवून आपण फरारी नसून कायदेशीर प्रयत्न करीत आहोत, हे न्यायालयात दाखविण्याचा प्रयत्न असावा, असा संशयही पाटील यांनी व्यक्त केला.

    अटकेनंतर बोठे याची बडदास्त ठेवली जात आहे, असा आरोप जरे यांचा मुलगा रुणाल यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत पोलिस अधीक्षकांनी पोलिसांची बाजू मांडली. हैदराबादमध्ये कारवाई करताना पोलिस आल्याचे आरोपींच्या लक्षात येऊ नये, यासाठी खासगी गाड्या वापरण्यात आल्या होत्या. तेथून आरोपीला नगरला सुरक्षित आणणे हेही आव्हानात्मक काम होते. त्यामुळे पळून जाण्याची संधी न मिळता सुरक्षित प्रवास करता येईल, अशी गाडी वापरण्यात आली. यात आरोपीची बडदास्त ठेवण्याचा विषय नाही. आरोपी पत्रकार आणि वकील असल्याने त्याच्याकडून कायदेशीर पळवाटा शोधण्याचा सतत प्रयत्न होत आहे. त्यामुळे पोलिसांनाही कायदेशीर पद्धतीनेच काम करावे लागत आहे, असे पाटील यांनी सांगितले.