महावितरणच्या अहमदनगर मंडळाच्या अधिक्षक अभियंतापदी सुनील काकडे; सांगळे यांची सोलापूरला बदली

    अहमदनगर : महावितरणच्या अहमदनगर मंडळाचे अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांची प्रशासकीय बदली सोलापूर मंडळ येथे झाली असल्याने अहमदनगर मंडळाच्या अधिक्षक अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून नियुक्त करण्यात आलेले सुनील काकडे यांनी अधिक्षक अभियंता पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते कल्याण मंडळाचे अधिक्षक अभियंतापदी कार्यरत होते.

    महावितरणमध्ये सुनील काकडे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे. जालना येथे कनिष्ठ अभियंता म्हणून जुलै १९९७ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळात सेवेची सुरुवात त्यांनी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता म्हणून धुळे, चाळीसगाव, नाशिक शहर मंडळ, औरंगाबाद ग्रामीण, भुसावळ विभाग येथे त्यांनी कार्य केले आहे. मे २०१७ मध्ये सरळ सेवेने त्यांची अधिक्षक अभियंतापदी कल्याण मंडळात नियुक्ती झाली होती.

    महावितरणच्या अहमदनगर मंडळ कार्यालयात रुजू झाल्यानंतर कार्यकारी अभियंते, विविध विभाग प्रमुख, सर्व संघटना यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंडळातील सर्व ग्राहकांना निरंतर व अखंडित वीज सेवा देण्याकरिता तसेच महावितरणच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरिता नेहमीच तत्पर व कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.