अत्याचार प्रकरणातील निलंबित पोलिस निरीक्षक विकास वाघ अटकेत; गेल्या तीन महिन्यांपासून फरार

    अहमदनगर : अत्याचाराच्या गुन्ह्यात तीन महिन्यांपासून फरार असलेला निलंबित पोलीस निरीक्षक विकास वाघ याला नाशिक येथून नगर पोलिसांनी ताब्यात घेतले. अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाघ याला अटक करून आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली.

    कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ अनेक कारणांनी वादग्रस्त ठरल्यानंतर त्याची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात केडगावातील एका महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वाघ विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, याच महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दुसरा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पसार असलेला वाघ याला आज गुरुवारी अटक करण्यात आली आहे.

    लोकेशनच्या आधारे अटक

    नगरचे एसपी मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश दिल्यानंतर मोबाईल लोकेशनच्या आधारे वाघ याला नाशिक येथे भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत पकडले. हायकोर्टातून जामीन मिळाल्यानंतर वाघ याने पिडीत महिलेचे नाव आणि हनीट्रॅपशी जोडून बदनामी करण्याचा प्रयत्न करणार केला. मी सांगेल तसे प्रतिज्ञापत्र दे, नाहीतर कायमचे संपविले अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.