अखेर भंडारदरा धरण रविवारी ‘फुल्ल’; उत्तर नगर जिल्ह्यात आनंद

पाऊस सुरु झाला की भंडारदरा परिसरात दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. विशेषतः १५ ऑगस्टला धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

  संगमनेर : दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी भरत असलेले भंडारदरा धरण तब्बल २७ दिवस उशिराने भरले. शनिवारी सायंकाळी धरणाचा पाणीसाठा १०५५९ द.ल.घ.फू होऊन धरण ९५.६५ टक्के भरले आहे. तर सुरु असलेल्या पाण्याची फ्लोनुसार धरण १२ सप्टेंबर २०२१ रोजी पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  यंदा पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावल्याने जिल्हयात सुरुवातीला चिंतेचे वातावरण होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला. अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात पाऊसाचा जोर ओसरल्याने दरवर्षी भंडारदरा धरण १५ ऑगस्टला तुडूंब भरण्याचे परंपरेत यंदा खंड पडला होता. यामुळे सर्वांची चिंता वाढली गेल्या चार-पाच दिवसांत पुन्हा जोरदार पाऊसाला सुरुवात झाल्याने १२ सप्टेंबर २०२१ रोजी भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तब्बल २७ दिवस उशिराने धरण भरले आहे. निळवंडे धरण ८२ टक्के भरले आहे.

  शनिवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १० हजार ५५९ द.ल.घ.फु.झाला होता. तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६ हजार ७७८ द.ल.घ.फु झाला होता. भंडारदरा धरणात रोज ३९० द.ल.घ.फु नवीन पाण्याची आवक होत आहे.

  शनिवारी दिवसभरात पाणलोट क्षेत्रातील घाटघर – ८१मि.मी. रतनवाडी – १२७ मि.मी, पांजरे – ६९.मि.मी, वाकी – ५१ मि.मी, भंडारदरा(धरण) – ७० मि.मी.,निळवंडे(धरण) – १८ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे तर १ जुन २०२१ पासून आत्तापर्यंत सर्वाधिक घाटघर ३३३५ मि.मी.,रतनवाडी ३२३६ मि.मी.एवढा पाऊस झाला आहे तर आढळा विभागात पावसाचे प्रमाण कमी असुन आढळा धरण परिसरात केवळ २५८ मि.मी.पाऊस झाला आहे.

  पाऊस सुरु झाला की भंडारदरा परिसरात दरवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. विशेषतः १५ ऑगस्टला धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्याने यावेळी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षात कोरोना प्रार्दुभावाने पर्यटकांची संख्या नसल्याने या भागातील पर्यटकाच्या रेलचेलीमुळे उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक आदिवासी तरुणांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला होता. यावर्षी पर्यटकांची संख्या जास्त असण्याची शक्यता होती. मात्र, यावर्षी पावसाळ्याचे सुरूवातीलाच जिल्ह्यातील काही मंद्यधुंद पर्यटकांनी धुडगूस घातला.

  यावेळी पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने भंडारदरा भरले नाही. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणलोटक्षेत्रात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. परिसर निसर्गरम्य धबधब्याने नटला आहे. तसेच भंडारदरा धरणही भरले आहे. पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. लवकरच ॲम्बेला फॅालही प्रवाहित होईल. त्यामुळे पर्यटकांना मनमोहक करणारे वातावरण असल्याने येत्या काही दिवसांत पर्यटक वाढण्याची अपेक्षा या आदिवासी भागातील गोरगरीब तरुण व्यावसायिकांना आहे.

  सुमारे 4 हजार क्युसेकने पाणी सोडणार

  रविवारी सकाळी ६ वाजता 10 हजार 974 साठा होता तर 9 वाजता पाणीसाठा 11 टीएमसी झाले आणि धरण भरले होते. एकंदर 10 हजार 500 दलघफुटला भंडारदरा तांत्रिकदृष्ट्या भरलेला असतो, असे प्रशासन घोषित करत असते. त्यामुळे आजची आवक पाहता 3 ते 4 हजार क्युसेकने पाणी निळवंडे धरणात सोडले जाणार आहे, असे धरणाचे उप अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले.