शिर्डी साई संस्थानची धुरा आता IAS अधिकारी भाग्यश्री बानायत या महिला अधिकाऱ्याकडे

संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे IAS अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

    आपल्या वादग्रस्त कारकीर्दीमुळे चर्चेत आलेले कान्हूराज बगाटे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आता IAS अधिकारी भाग्यश्री बानायत-धिवरे यांची नियुक्ती करण्यात आहे. याआधी भाग्यश्री या रेशीम उद्योग विभागाच्या संचालकपदी कार्यरत होत्या.

    संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे IAS अधिकारी नसल्याने त्यांची नेमणूक रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही बदली करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कान्हूराज बगाटे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी नसल्याने त्यांच्या नियुक्तीविरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी याचिका दाखल होती. यात त्यांनी बगाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती.

    या याचिके नंतर उच्च न्यायालयाने पोलीस प्रशासनाला नोटीस बजावली व त्यानंतर आता बगाटे यांची उचलबांगडी करत त्यांच्याजागी IAS अधिकारी असलेल्या भाग्यश्री बानायत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बगाटे यांना दुसरी नियुक्ती देण्यात आलेली नसल्याने ते अद्यापही नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

    दरम्यान, आता शिर्डी साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने शिर्डी संस्थानचा कारभार आता व्यवस्थित चालेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.