जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले; माजी आमदार मुरकुटेंची टीका

    अहमदनगर : शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. पाऊस गायब झाला असल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. कोरोना महामारीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातुन शेतीसाठी आवर्तन सोडावे. आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे. अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला.
    जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल विभागाच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांना तसे निवेदन दिले. मुरकुटे यांचेसमवेत रितेश भंडारी, तुळशीराम झगरे, भाऊराव नगरे, अमित गटने उपस्थित होते.
    तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडली असताना विद्यमान जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते. आता ते राज्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत.
    आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता. त्यांनी नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल केली. मतदारसंघात ते दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात. त्यासाठी मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो. परंतु मंत्रीमहोदय मुंबई येथे एसीमध्ये बसून राहतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना विसर पडला असल्याचा आरोप बाळासाहेब मुरकुटे यांनी केला.