साहेब ऽऽ… लवकर टँकर सुरू करा! ; तळेवाडी येथील पाणी वाहून आणणार्‍या शेतकर्‍याने मांडली व्यथा

कायमच दुष्काळच्या झळा सोसणार्‍या संगमनेर तालुक्याचा पठारभागात कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी टंचाई भासू लागली आहे. अनेक कुटुंबातील पुरुष आपल्या दुचाकीला अथवा सायकलीला पाण्याचे ड्रम बांधून एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पिण्याचे पाणी वाहून आणत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.

    संगमनेर : साहेब… पाणी संपून खूप दिवस झाले आहेत. पाण्याअभावी प्रचंड हाल होवू लागले आहेत. त्यामुळे रोज दोन किलोमीटर अंतरावरून दुचाकीला ड्रम बांधून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे, अशी व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागावरील पोखरी बाळेश्वर गावांतर्गत असलेल्या तळेवाडी येथील शेतकरी अण्णासाहेब राजाराम काळे यांनी तळेवाडी येथील पाणी वाहून आणणार्‍या शेतकर्‍याने मांडली व्यथामांडली आहे.

    कायमच दुष्काळच्या झळा सोसणार्‍या संगमनेर तालुक्याचा पठारभागात कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी टंचाई भासू लागली आहे. अनेक कुटुंबातील पुरुष आपल्या दुचाकीला अथवा सायकलीला पाण्याचे ड्रम बांधून एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पिण्याचे पाणी वाहून आणत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. त्यातच पठारभाग हा डोंगरदर्‍यांमध्ये वसलेला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गावांसह वाड्या-वस्त्या विखुरलेल्या आहेत. परंतु, मोठमोठे डोंगर आणि वनसंपदा असूनही म्हणावे तसे पाण्याचे उद्भव नसल्याने कायमच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गेली दोन वर्षे सलग चांगला पाऊस होवूनही निचर्‍याची जमीन असल्याने पाणी वाहून जातेे. त्यातच परिसरात पाणीसाठे कमी प्रमाणात असल्याने पाणी साठले जात नाही. याचा परिणाम शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यावर दिसून येतो.

    दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी कुटुंबियांना वणवण करावी लागते. आजही हे दृश्य कायम असून कडक उन्हाळा सुरू झाला असून पाणी टंचाईच्या झळा पोखरी बाळेश्वर, तळेवाडी, वरवंडी, पिंपळगाव देपा, खंडेरायवाडी यांसह आदी वाड्या-वस्त्यांना बसू लागल्या आहेत. येथील कुटुंबातील कर्तबगार सदस्यांसह अबालवृद्धांना पाण्यासाठी पायपीट करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तर तळेवाडी येथील अनेक पुरुष आपल्या दुचाकीला अथवा सायकलला ड्रम बांधून सुमारे एक-दोन किलोमीटर अंतरावरुन पाणी वाहून आणत आहे. त्याचबरोबर वरवंडी गावांतर्गत असलेल्या चौधरीवाडीला पिण्याच्या पाण्याची मोठी झळ बसू लागल्याने त्यांनी पंचायत समितीकडे टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. वर्षानुवर्षांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणार्‍या पठारभागाच्या टँकरमुक्तीचे स्वप्न कधी पूर्ण होईल, अशी भाबडी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.