बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गावंडे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी; पिचड यांची मागणी

    अकोले : बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गावंडे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी व बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली. तालुक्यातील धुमाळवाडी येथील संतोष गावंडे या युवकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले. त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, यासाठी माजी आमदार पिचड यांनी वनविभागाच्या कार्यालयात जाऊन वनपरिक्षेत्र अधिकारी बी.एम.पोले यांची आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

    बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या संतोष गावंडे याच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल, याची विचारपूस करीत ही मदत लवकरात लवकर मिळवून द्यावी, असे पिचड यांनी वनाधिकारी यांना सांगितले. त्यात या नरभक्षक बिबट्याचा शोध घेऊन त्यास तात्काळ जेरबंद करावे. सध्या नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. शेतकरीवर्ग रात्री-अपरात्री आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी लवकरात लवकर उपाय योजना करावी, अशी मागणी केली.

    नुकतेच माजी आमदार वैभवराव पिचड यांनी संतोष गावंडे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तसेच स्वतः या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन दिलासा दिला. यावेळी त्यांच्या समवेत भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल देशमुख, रमेश राक्षे, मच्छिंद्र  मंडलिक, शंभू नेहे, नगरसेवक सचिन शेटे,नरेंद्र नवले,राज गवांदे,सुशांत वाकचौरे,अविनाश तळेकर,राजेंद्र देशमुख,सौरभ देशमुख,गोकुळ वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.