भक्ष्याच्या शाेधात होता बिबट्या; पडला विहिरीत अन्…

    राहुरी : केशव गोविंद बन येथील भगत वस्तीवर शेळी घेऊन बिबट्या विहिरीत पडला. विहिरीत भक्ष्य सोडून देऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोहत बसण्याची वेळ बिबट्यावर आली होती. वन विभागाने त्याला पाण्याबाहेर काढले. प्रवरा नदी काठावर गारवा असल्याने बिबट्या वावर वाढला आहे. या आगोदर देखील भगत वस्तीवर बिबट्या पिंजऱ्यांत कैद करण्यात आला होता. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत

    …अन् शेळीला काढले बाहेर

    शेतकरी रमेश निवृत्ती भगत यांच्या घरासमोर बांधलेल्या शेळीवर बुधवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. शेळी ओढून नेत असताना अंदाज न आल्याने बिबट्या भक्ष्य घेऊन विहिरीत पडला. बिबट्याच्या डरकाळीच्या आवाजाने शेतकरी रमेश भगत यांनी विहिरीत डोकावलं असता बिबट्या व शेळी दिसले. त्यांनी आवाज देऊन परिसरातील युवकांना बोलावलं. तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून पहिल्यांदा शेळीला सुखरूप बाहेर काढले. मात्र, बिबट्या बाहेर कोण काढणार असा प्रश्न पडला. समयसूचकता दाखवत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.

    ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

    काही तासातच वनविभागाचे कर्मचारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. अंधारात ग्रामस्थांच्या मदतीने वनखात्याचे कर्मचारी वनपाल भाऊसाहेब गाढे, सूर्यकांत लांडे, विकास पवार, गोरख सुरासे यांनी विहिरीत बाज सोडली. सोडलेल्या बाजेवर बिबट्या अलगद येऊन बसला. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद हाेताच ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला.