शिर्डीतील राजेंद्र धीवर यांच्या हत्येप्रकरणाचा छडा अखेर लागला; चार आरोपी अटकेत

    शिर्डी : शिर्डीतील राजेंद्र धीवर यांच्या हत्येचा गुंता सोडवण्यात पोलीसांना यश आले. दहा-बारा वर्षापासून सुरू असलेल्या वादातून सुपारी देऊन ही हत्या झाली. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.

    २९ जुन रोजी राजेंद्र आंतवन धिवर व संजय पवार हे शिर्डीतील दोघे तरुण राहात्यावरून रोजंदारीच्या कामावरून परतत असताना नगर-मनमाड मार्गावर हॉटेल निसर्गसमोर मोकळ्या जागेत बसले होते. त्यावेळी त्यांच्याकडे काडीपेटी मागण्याचे कारण काढून धारधार शस्त्रांनी राजेंद्र धीवर यांची हत्या करून चार आरोपी फरार झाले होते.

    पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक संजय सातव व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी एलसीबीचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक गणेश इंगळे व कर्मचारी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, सहाय्यक निरीक्षक दिपक गंधाले, प्रविण दातरे, उपनिरीक्षक बारकू जाने, सुरेखा देवरे, सहाय्यक फौजदार कैलास कुºहाडे व उपविभागीय कार्यालयातील सुरेश देशमुख यांची वेगवेगळी पथके करून तपास करण्यात आला.

    गुन्हा तत्कालीन कारणावरून घडल्याचे दिसत असल्याने व मागे पुरावा नसल्याने पोलीसांच्या समोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान होते. पोलीसांनी चाळीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. त्यात आरोपींच्या चेहऱ्यांची व वाहनांच्या नंबरची स्पष्टता नसल्याने फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यावरून आरोपी नाशिकच्या दिशेने गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत नाशिक आयुक्तालयातील गुन्हे शाखेला आरोपींचे फोटो व मोटारसायकलचे वर्णन कळवण्यात आले. त्यानुसार नाशिक पोलीसांनी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे व अविनाश प्रल्हाद सावंत या पाथर्डी गाव, जिल्हा नाशिक या एकोनावीस वर्षीय युवकांना ताब्यात घेवून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले.

    आरोपींनी शिर्डी पोलीस ठाण्यात आणून अधिक तपास केला असता त्यांनी शिर्डीतील कालीकानगर भागातील अमोल सालोमन लोंढे याच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याचे सांगितले. पोलीसांनी अमोलकडे चौकशी केली असता त्याचे मयत राजेंद्र धिवर याचे दहा-बारा वर्षांपासून वाद असल्याने त्याने शिर्डीतील अरविंद महादेव सोनवणे, श्रीरामनगर याच्या ओळखीने नाशिकच्या राजु उबाळे याला चार लाखांची सुपारी देवून राजेंद्र धीवरची हत्या केल्याचे सांगितले. या चारही आरोपींनी पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.