प्रकरण सामोपचाराने मिटवण्याकरिता मध्यस्थाची भूमिका महत्वाची : न्या. यार्लगड्डा

  अहमदनगर : मध्यस्थी प्रक्रियेमध्ये प्रकरण सामोपचाराने मिटविण्याकरीता पक्षकार व वकिलांबरोबरच मध्यस्थाची भूमिका अतिशय महत्वाची असते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अहमदनगर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी केले.

  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सेंट्रल बार व अहमदनगर बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात आयोजित केलेल्या मध्यस्थी प्रक्रीयेबाबतच्या जागरुकता कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा न्यायाधीश – 1 एम.व्ही. कुर्तडीकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्या. रेवती देशपांडे, जिल्हा सरकारी अभियोक्ता अहमदनगर ॲड. एस.के. पाटील, सेंट्रल बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष भूषण ब-हाटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

  न्या. यार्लगड्डा म्हणाले, मध्यस्थी प्रक्रियेबाबत पक्षकारांचा सकारात्मक दृष्टीकोन आणि वकिलांचे सहकार्य असले की मध्यस्थी प्रक्रिया निश्चितच यशस्वी होते. तसेच मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मध्यस्थाला पक्षकारांना पर्याय सूचवून द्यावे लागतात आणि मध्यस्थी प्रक्रियेमध्ये जी चर्चा होते त्याबाबत गोपनीयता राखली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगीतले. दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये नमूद केल्याप्रमाणे पक्षकारांनी व वकिलांनी मध्यस्थी प्रक्रियेचा लाभ करून घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

  जिल्हा विधी सेवा प्राधिकरनाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी, मध्यस्थीची संकल्पना अतिशय पुरातन असुन रामायनामध्ये अंगद याने मध्यस्थाची भूमिका निभावली होती असे सांगितले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांचे मार्फत ब-याच प्रकरणांमध्ये मध्यस्थी प्रक्रिया फक्त राबवलीच जात नाही तर यशस्वी केली जाते, असेही स्पष्ट केले. प्रलंबित प्रकरणांव्यतिरिक्त दाखलपूर्व प्रकरणांत देखील मध्यस्थी प्रक्रिया राबविली जाते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

  ॲड. भुषण ब-हाटे यांनी मध्यस्थीचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. मध्यस्थीमुळे पक्षकारातील आपसातील संबंध चांगले होतात. ॲड.सुभाष काकडे यांनी मध्यस्थीमध्ये पक्षकार व वकिलांची भूमिका या विषयावर बोलतांना पक्षकारांचा या प्रक्रियेमध्ये उत्स्फूर्त सहभाग असला पाहिजे असे प्रतिपादन केले.

  कार्यक्रमास मध्यस्थ विधीज्ञ, विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, विधी शाखाचे विद्यार्थी आणि पक्षकार उपस्थित होते. सदर कार्यक्रम आभासी पध्दतीने देखील प्रसारीत करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड. अभय राजे यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कनिष्ठ लिपीक भारती पाठक यांनी केले.