वडापाव खाण्यासाठी थांबले होते चोर; तरुणांना संशय आला अन् सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले

    नेवासा (अहमदनगर) :  हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी थांबले असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकले. बचावासाठी धूम स्टाईलने पळालेल्या संशयितांना ग्राम सुरक्षा दल आणि पोलिसांनी पाठलाग करून सिनेस्टाईल पकडले. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे आज सकाळी हा थरारक घटनाक्रम घडला.

    सोनई बसस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये वडापाव खाण्यासाठी निळ्या रंगाच्या टाटा सफारी मोटारीमधून चौघे थांबले. चौघांच्या संशयास्पद हालचाली सोनईतील युवकांनी हेरल्या. गावकऱ्यांना संशय आल्याचे लक्षात येताच चोरटे सफारीमधून पसार झाले. वांबोरी रोडने वेगाने निघालेल्या या संशयितांचा ग्रामसुरक्षा दलाचे युवक व पोलिसांनी पाठलाग केला. ग्रामसुरक्षा दल आणि पोलिसांनी चोरट्यांना मोरया चिंचोरे शिवारात खिंडीत गाठले. उसाच्या शेतात पळालेल्या तिघांना पकडण्यात यश आले. तर एक चोरटा पसार झाला.

    मोरया चिंचोरे शिवारातील एका शेतात मोटार (ए.पी.०४ सी.जी.२००७) लावून सर्व संशयित उसाच्या शेतातून पळत असताना पोलिस व युवकांनी पाठलाग करून तिघा संशयितांना पकडल्याची बातमी समजतात नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पकडलेले संशयित कुठून आले, कशासाठी आले, त्यांचे कोणी साथीदार आहेत का, याचा शोध सोनई पोलिसांकडून सुरू आहे.

    दरम्यान, पकडलेले तिघे हे मध्यप्रदेशातील असल्याचे समजते. सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. सोनई परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांचा प्रतिकार करणारा कृष्णा चांडक हा तरुण चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला.