केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिल्यामुळे ‘हे’ डोस मिळू शकले नाहीत; मंत्री हसन मुश्रीफ यांची टिका

करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने जून महिन्यात दहा कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले मात्र केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली. त्यामुळे हे डोस मिळू शकलेले नाहीत असा खळबळजनक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

  अहमदनगर :  करोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस उत्पादित करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने जून महिन्यात दहा कोटी डोस उपलब्ध करून देण्याचे कबूल केले मात्र केंद्र सरकारने सिरम इन्स्टिट्यूटला धमकी दिली. त्यामुळे हे डोस मिळू शकलेले नाहीत असा खळबळजनक आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

  दरम्यान ते म्हणाले की, एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे कंपन्यांना धमक्या द्यायचा असा प्रकार सुरू आहे. राज्य सरकारच्या शिवस्वराज्य उपक्रमाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा परिषदेत झाला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

  एकच राष्ट्रीय धोरण असावे

  छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या लसीकरणाच्या गोंधळाबद्दल ते म्हणाले, ‘लसीकरणासाठी एकच राष्ट्रीय धोरण असावे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारने आणि त्यापुढील वयोगटातील नागरिकांना केंद्र सरकारने लस द्यायची, हे धोरण योग्य नाही.

  पवार लवकरच मोदीची भेट घेणार

  तिकडे पश्चिम बंगालमध्ये लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो लावण्यात येत आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागिरिकांच्या प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो तर त्यापुढील नागरिकांच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो, देशात असा गोंधळ सुरू आहे. असे असेल तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर लावू असा इशारा त्यांनी दिला. लसीकरणावरून देशात हा जो गोंधळ सुरू आहे, यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याकडून हे सर्व मुद्दे मांडले जाणार आहेत,’ असेही मुश्रीफ म्हणाले.

  २५ कोटी लसीचे डोस अमेरिका देणार

  मुश्रीफ म्हणाले की, अमेरिकेने आपल्याला लसींचे २५ हजार कोटींचे डोस दिले. असे सांगुन मुश्रीफ यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्षा भारतीय वंशाचा कमला हॅरिस यांचे आभारच मानले पाहिजेत. अमेरिकेच्या निवडणुकीत आपल्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांचा प्रचार केला. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना भारतात आणले. असे असले तरी याचा आकस न धरता, भारतीयांवर अन्याय होऊ नये यासाठी आपल्याला २५ कोटी लसीचे डोस देण्याचे अमेरिकेने ठरविले आहे. त्यामुळे त्यांचे आभार. अमेरिकेच्या अध्यक्षांचे मन किती मोठे आहे,’ हे यावरून लक्षात आले, असेही मुश्रीफ म्हणाले.