परखतपूर येथील महादेव मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला; ६० हजार रुपये लंपास

    अकोले : परखतपूर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अकोले तालुक्यातील परखतपूर येथील महादेव मंदिरात गुरुवारी (दि. १९) रात्री दोन चोरट्यांनी दानपेटी फोडून भाविकांच्या दानावर डल्ला मारला. यात सुमारे ६० हजार रुपयांची चोरी झाली. याबाबत अकोले पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    परखतपूर येथील महादेव मंदिरात रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी कटावणीच्या साह्याने दानपेटी उचकटून दान पेटीतील पैसे लंपास केले. शुक्रवारी सकाळी परखतपूर येथे महादेव मंदिरात पूजा व दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दानपेटी फोडून चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली.

    ग्रामपंचायतमार्फत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या चोरीचा प्रकार कैद झाला. याचे चित्रिकरण पोलिसांनी तपासल्यावर चोरट्याच्या मुसक्या आवळण्यास पोलीसांना मदत होऊ शकेल, असे परखतपूरचे सरपंच प्रशांत वाकचौरे, अविनाश देशमुख, भारत वाकचौरे यांनी सांगितले.