suicide

कुटुंबियांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत होते. त्यातूनच त्यांनी कुटंबियांसह स्वत:ची जीवनयात्रा संपविली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर शहरातील केडगाव (Kedgaon) उपनगरामध्ये एका कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी समोर आली.  कर्जाच्या आर्थिक विवंचनेतून ही घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.

    संदीप दिनकर फाटक (वय ४६), किरण संदीप फाटक (वय ४३) आणि मैथिली संदीप फाटक (वय १०) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांचे मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. संदीप फाटक हे व्यावसायिक असून, त्यांचे उत्पन्न कमी झाले होते. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाना तोंड द्यावे लागत होते. त्यातूनच त्यांनी कुटंबियांसह स्वत:ची जीवनयात्रा संपविली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.

    दरम्यान, शेजारील रहिवाशांनी ही घटना कोतवाली पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला मुलीला गळफास देऊन नंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

    सुसाईड नोट मिळाली

    पोलिसांना घटनास्थळी एक सोसायटी नोट मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. संदीप फाटक यांची केडगाव सासरवाडी आहे. केडगाव भागातील ठुबे मळा येथील अर्थवनगरमध्ये ते राहत होते. रात्री फाटक कुटुंबीयांनी नातेवाईकांशी मोबाईलवर बोलणे केले. आज सकाळी या तिघांचे मृतदेह आढळून आले.