राहुरीत मायलेकीसह तिघांचा मृत्यू

    राहुरी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राहुरी तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत मायलेकीसह तिघांचा मृत्यू झाला. टाकळीमिया येथे माय-लेकीची तर वरवडीमध्ये एक असे तिघे मृत्युमुखी पडल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. देवळाली प्रवरा येथील विवाहित महिलेने ४ वर्षांच्या चिमुरडीसह विहिरीत उडी घेऊन टाकळीमिया येथे आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली.

    विद्या दिलीप कडू (वय २५) व सिद्धी दिलीप कडू(वय ४) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. त्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होत्या. देवळाली पोलीस चौकीत हरवल्याबाबत नोंद करण्यात आली होती. पंचवटी भागात एका विहिरीत सिद्धी कडू या चिमुरडीचा मृतदेह दिसून दिला. स्थानिक रहिवासी व विद्या कडू हिच्या माहेरच्या लोकांनी विद्या हिचा शोध घेण्यास सुरुवात केली. विहितील पाण्याची पातळी जास्त व विहिरीत तळाच्या गाळात विद्याचा मृतदेह रुतल्याने तिचा मृतदेह पाण्यावर तरंगू शकला नाही. पट्टीच्या पोहचणाऱ्या तरुणांनी रात्री गळाच्या सहायाने शोध घेतला असता विद्या हिचा मृतदेह गळाला लागला.

    वरवंडी येथील नितीन मोतीराम भालेराव या ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन भालेराव हा रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता. प्रात:विधीच्या निमित्ताने राहुरी कृषी विद्यापीठ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला. खूप उशीरापर्यंत नितीन परतला नाही. म्हणून त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहण्यासाठी गेला असता लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदन करण्यात आले. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली.