जेऊरमध्ये कडकडीत बंद; संतुकनाथ बाबांच्या आरतीला मज्जाव

  अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : नगर तालुक्यातील जेऊर येथे संतुकनाथ बाबांच्या मठातील आरती व पुजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गावातील वातावरण चांगलेच चिघळले असून, निषेध म्हणून ग्रामस्थांकडून स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवण्यात आले होते.

  जेऊर येथे संतुकनाथ बाबांची संजीवन समाधी आहे. येथे राज्य तसेच परराज्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने येत असतात. बाबांच्या संजीवन समाधीची पुजा व आरती २५ वर्षांपासून संतुकनाथ सेवा मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात येत आहे. संतुकनाथ सेवा मंडळ गावामध्ये विवीध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. रक्तदान शिबिर, कोरोना काळात किराणा वाटप, गावामध्ये दिंडीचे आयोजन, निवृत्त माजी सैनिकांचा सत्कार समारंभ असे विविध उपक्रम संतुकनाथ सेवा मंडळाकडून आज पर्यंत राबविण्यात आलेले आहेत.

  रविवारी (दि. २५) रफिक शेख व प्रदिप पवार यांनी मठामध्ये आरती व पुजा करण्यास मज्जाव केल्याने वातावरण चांगलेच चिघळले. ग्रामस्थांनी स्वयंस्फूतीर्ने सोमवारी (दि.२६) गाव बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवला.

  कालभैरवनाथ देवस्थानचा खुलासा

  जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या संजीवन समाधीची जमीन व इतर अधिकार श्री क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान सोनारी जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडे आहेत. या प्रकरणी सोनारी येथील मठाधिपती पिर योगी शामनाथजी महाराज यांनी खुलासा केला आहे. त्यामध्ये समाधीस्थळी सर्व जाती धर्माचे लोक दर्शनासाठी येऊ शकतात. रफिक शेख व पुजारी प्रदिप पवार यांनी मठातील सेवेबाबत हस्तक्षेप करण्यास मनाई करण्यात आली आहे. महंत स्वत: जेऊर येथे येऊन यावर मार्ग काढणार आहेत. सोशल मीिडयावर चुकीचे संदेश पाठवू नये. गावात शांतता राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  ग्रामस्थांकडून निषेध

  जेऊर परिसरातील धार्मिक स्थळी सुरु असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करुन कारवाई करण्याबाबतचे निवेदन जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात येणार आहे. जेऊर येथील संतुकनाथ सेवा मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. संतुकनाथ बाबांच्या आरतीला व पूजेला मज्जाव करण्यात आला. या घटनेचा जेऊर परिसरातील ग्रामस्थांकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.