पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात व्यापारी अनिल गावडे सहआरोपी

    अहमदनगर : राहुरीचे पत्रकार रोहिदास दातीर खून प्रकरणात पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे यांना सहआरोपी केले आहे. खून प्रकरणातील आरोपींना आर्थिक मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्याला आरोपी करण्यात आले.

    राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काहींनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवून त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले होते. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे यास नेवासा फाटा येथून तर दुसरा आरोपी अक्षय कुलथे यास उत्तर प्रदेश येथून शिताफीने अटक केली.

    गुन्ह्याचा तपास सुरू असताना व्यापारी अनिल गावडे याने आरोपी कान्हू मोरे यास आर्थिक मदत केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या प्रकरणात राजकीय दबाव असल्यामुळे व्यापारी अनिल गावडे यास आरोपी करणार नाहीत, अशी राहुरी परिसरात दबक्या आवाजात चर्चा होती. मात्र, राहुरी पोलिसांनी व्यापारी अनिल गावडे याला सहआरोपी केले. त्यानंतर न्यायालयात सविस्तर रिपोर्ट सादर केला आहे.