नागरिकांना आदरयुक्त वागणूक द्या : तहसीलदार उमेश पाटील

    अहमदनगर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सर्व नागरिकांना आदरयुक्त वागणूक द्या, अशी सूचना तहसीलदार उमेश पाटील यांनी नवनियुक्त तलाठी यांना दिली आहे. जेऊर येथे नवनियुक्त तलाठी यांच्यासाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना तहसीलदार उमेश पाटील यांनी शासनाचे आपण ग्रामस्तरीय प्रमुख प्रतिनिधी आहोत. त्यामुळे आपल्याकडे येणाऱ्या नागरिकांना आदरयुक्त वागणूक देण्यात यावी. लोकांच्या अडचणी वेळेत नियमानुसार सोडविण्यात याव्यात, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

    सोमनाथ गलांडे व देवेंद्र परदेशी यांनी संगणीकृत सातबारा उता-याविषयी माहिती दिली. आबासाहेब पवार व मोसीन पठाण यांनी कार्यालयीन कामकाजाविषयी मार्गदर्शन केले. तर नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

    यावेळी ग्रामस्तरीय नोंदी, कागदपत्रांची पडताळणी, नोटीस बजावण्याची पद्धत, शेत नोंदीचे प्रकार, दुय्यम निबंधकांमार्फत आलेल्या नोंदीची कार्यवाही याबद्दल नवनियुक्त तलाठी यांना प्रशिक्षण देण्यात आले. मंडळाधिकारी वृषाली करोसिया यांनी नवनियुक्त तलाठी यांचे आभार मानून स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना खोसपुरी तलाठी सुनंदा फुंदे यांनी केली.