संजय राऊत यांनी कंगना राणावतची माफी मागावी; तृप्ती देसाई यांची मागणी

अहमदनगर: शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील वाद अजूनही थांबताना दिसत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनावर टीका करताना अपशब्द वापरला. त्यावरून राऊत यांना अनेकांनी लक्ष्य केलं. यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या वादात उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी कंगना राणावतची माफी मागायला हवी. अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगानं राऊत यांच्यावर कारवाई करायला हवी, अशी भूमिका देसाई यांनी मांडली.

कंगना राणावत यांनी मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ सुरू आहे. कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

‘कंगना राणावत यांनी मुंबई सुरक्षेबाबत ट्विट केलं होतं. त्यांना अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्या व्यक्त झाल्या. मात्र त्यानंतर त्यांना विरोध सुरू झाला. कंगना राणावत यांचं ट्विट चुकीचं होतं, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे,’ असं देसाई म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ‘सत्तेत असलेल्या शिवसेनेचे आमदार राणावत यांचे थोबाड रणरागिणींच्या माध्यमातून फोडू, अशा धमक्या देतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणात यांच्याविषयी अपशब्द वापरले आणि माफी मागयाला ते तयार नाहीत. तरी तातडीनं संजय राऊत यांनी कंगना राणावत यांची माफी मागायला हवी,’ अशी मागणी देसाई यांनी केली.

एखाद्या महिलेबद्दल असे शब्द वापरणं म्हणजे तिच्या सन्मानावर आघात करण्यासारखंच आहे. ज्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान केला जातो, तिथे अशा पद्धतीनं एका खासदारानं वक्तव्य करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे, असंदेखील देसाई पुढे म्हणाल्या. संजय राऊत यांनी पुढे येऊन मोठ्या मनानं कंगना राणावत यांची माफी मागायला हवी. अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगानं संजय राऊत यांच्यावर कारवाई करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणावतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’ असा सवाल कंगनाने ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

काय म्हणाले संजय राऊत?

कंगनाने महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान

“मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा”, असे आव्हान कंगनाने दिले आहे.