व्यंकटेश पतसंस्थेचे दोन संचालक गजाआड, बाकी फरार

    नेवासा : नेवासा तालुक्यातील सोनई येथील व्यंकटेश सहकारी पतसंस्थेतील कर्मचारी व संचालक मंडळांनी तब्बल १ कोटी ९३ लाख ७४०६ रुपयांचा आर्थिक घोटाळा केला होता. त्याप्रकरणी दोन संचालकांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गजाआड केले. इतर सर्व संचालक मंडळ फरार झाल्याने त्यांची अटक टळली आहे. ही कारवाई शुक्रवार (दि.४) सकाळी करण्यात आली.

    याबाबत माहिती अशी की, १ कोटी ९३ लाख ७४०६ रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाचा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. ठेवीदारांचे पैसे मिळत नव्हते, जामीन अर्ज फेटाळल्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून आपापले व्यवसाय करत होते. शुक्रवारी सकाळीच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी गावात धरपकड सुरू करताच खळबळ उडाली होती. त्यात संधी साधून डॉ. सुनील मदनलाल बंग, आनंद अशोकलाल भळगट, अभय कुमार शांतीलाल चंगेडिया यांच्यासह अनेक संचालक फरार झाले. त्यामध्ये संचालक तेजकुमार हिरालाल गुंदेचा व गोपाल रुपचंद कडेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नेवासा न्यायालयात हजर करून नगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगरकडे नेले. या सर्वांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    या पतसंस्थेच्या घोटाळ्यातील या अगोदर गणेश गोरे, गणेश तांदळे व श्यामसुंदर खामकर या तीन कर्मचाऱ्यांना अटक झाली होती. त्यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी काही रक्कम जमा करून जामिनावर सुटले आहे. खामकर हा एकमेव तुरुंगात आहे. त्यानंतर या संचालकांना गजाआड केले आहे. आता बाकीचे म्होरके कधी गजाआड होतील याकडे ठेवीदार सभासदाचे लक्ष लागले आहे.