आजोबासह नातू ट्रॅक्टरवरून करत होते पेरणी; झाला पलटी अन् मग…

    पारनेर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क :  ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात आजोबा व नातू जागीच ठार झाले. तालुक्यातील अलभरवाडी (वाडेगव्हाण) शिवारात ही दुर्घटना घडली.

    याप्रकरणी ट्रॅक्टर चालक जालिंदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८, यादववाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करण्यात आली आहे. तुकाराम भीमाजी तरडे (वय ४८) व शुभम दत्तात्रेय तरडे (वय १३) अशी अपघातात ठार झालेल्या आजोबा व नातवाची नावे आहेत. दुर्घटनेनंतर परीसरातील नागरिक, पोलीस निरीक्षक डॉ. नितिन गोकावे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तुकाराम तरडे व शुभम तरडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबददल जालींदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८ रा. यादववाडी, तरडे मळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

    ट्रॅक्टर बांधावर गेल्याने घात

    शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता यादववाडी शिवारातील शेतामध्ये ट्रॅक्टरला जोडलेल्या पेरणी यंत्रावर बसून तुकाराम भिमाजी तरडे व शुभम दत्तात्रेय तरडे पेरणी करीत होते. जालिंदर दुलदगड ट्रॅक्टर चालवत होता. पेरणी सुरू असताना चालक जालिंदर याने ट्रॅक्टर बांधावर चढवला. बांधावरील भ रावामुळे ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली तुकाराम तरडे व शुभम हे चिरडले गेले. त्यातच त्यांचा दुदेर्वी अंत झाला. दोघांच्याही डोक्यास तसेच पोटास जबर मार लागल्याचे पोेलिसांनी सांगितले.

    अपघाताबाबत संभ्रम

    पेरणी करताना ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाल्याची नोंद सुपे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर  रस्त्यावर पलटी झाल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात झालेली नोंद त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता ‘मी सुटीवर असल्याची सारवासारव’ गोकावे यांनी केली. मात्र घटनास्थळास गोकावे यांनी भेट दिल्याचा उल्लेख पाेलीसांत दाखल करण्यात आलेल्या नोंदीत आहे. या विसंगतीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.