साईनगरीतून भिक्षेकरी हटवण्यासाठी उपोषणाचा इशारा

  शिर्डी : भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वारंवार मागणी करूनही भिक्षेकऱ्यांना पाठीशी घालणारी शिर्डी नगरपंचायत भिक्षेकऱ्याची आश्रयदाती आहे का, असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादीच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली नाही तर येत्या गुरूवारी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा उभय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

  शिर्डीत मोठ्या प्रमाणावर भिक्षेकरी असून, त्यात व्यसनी, गुन्हेगारी प्रवृत्तीचेही लोक आहेत. या भिक्षेकऱ्यांना पकडून साईसंस्थानच्या इमारतीत त्यांना वैद्यकीय, भोजन, निवास व्यवस्था पुरवण्याबाबत संस्थानचे सीईओ, पोलीस निरीक्षक, नगरपंचायत मुख्याधिकारी व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. पोलिसांनी विसापूर भिक्षेकरी गृहाकडे चौकशी केली असता तेथे १६० जागा रिक्त असल्याचे त्यांनी कळवले होते. हे दोन्ही पर्याय असताना नगरपंचायत भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची पाठराखणच करत आहे. यामागे काय गौडबंगाल आहे का, असा सवाल निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

  शिवसेना-निवेदन द्यायला गेल्यावर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी दादागिरीची भाषा वापरत भिकारी, कुत्रे पकडणे आमचे काम नाही, असे सांगत घरपट्टी, पाणीपट्टी विरोधातही आंदोलन करता यापैकी काहीही होणार नाही, काय करायचे ते करा अशी धमकी दिली.

  – कमलाकर कोते

  भिक्षेकऱ्यांवर कारवाईचे अधिकार पोलिसांना आहेत. नगरपंचायत त्यांना मदत करत आहे, नगरपंचायतची भूमिका समजावून सांगणे याला दादागिरी म्हणणे गैर आहे. निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्धीसाठी विरोधकांचा फार्स आहे.

  – शिवाजी गोंदकर, नगराध्यक्ष.