आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार : बाळासाहेब थोरात

शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं. त्यावर आता आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे.

    अहमदनगर : शिवसेनेकडे असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष पद मिळाले तर त्याचा मला आनंद होईल. विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे द्यावं, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि त्यांचं माझ्या नावावर एकमत झाल्याचं देखील मला समजलं आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं.

    थोरात नेमकं काय म्हणाले?

    दरम्यान यावर आता काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत, असं मत व्यक्त करून विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहणार असल्याची ठाम भूमिका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. शनिवारी थोरात नगर दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनादरम्यान तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी उत्तम कामगिरी बजावली. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधित कोणताही विचार नाही किंवा चर्चाही नाही, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय.

    तसेचं आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही. यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे, असंही थोरात म्हणाले.