अहमदनगर शहर बँक घोटाळाप्रकरणी योगेश मालपाणी अटकेत; तब्बल १७ कोटींचा गैरव्यवहार

    अहमदनगर : अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या १७ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी आज योगेश मालपाणी यास अटक केली. राहुरी येथील डॉक्टर भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉक्टर उज्वला कवडे आणि विनोद श्रीखंडे या तीन डॉक्टरांची फसवणूक करत त्यांच्या नावे शहर बँकेतून कर्ज उचलले. या तिन्ही डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    डॉक्टर निलेश शेळके याने प्रस्तावित एम्स हॉस्पिटल उभारणीसाठी फिर्यादी डॉक्टरांना भागीदार करून घेतले. त्यांचे नावे परस्पर कर्ज उचलले. या प्रस्तावित हॉस्पिटलसाठी मशिनरी पुरविण्याचा ठेका योगेश मालपाणी यास देण्यात आला होता. याच प्रकरणात नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज मालपणी यास अटक केली.

    श्रीखंडे, कवडे आणि सिनारे यांच्या फिर्यादीवरून बँकेचे तत्कालीन संचालक, सीए आणि पुरवठादार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांच्या पथकाने मालपाणी यास अटक केली.