वेळेच्या पुढे विचार करणारा नेता अजित दादा

दादा बोलायला वागायला अनेकांना कडक वाटतात. तडक फडक ते बोलतातही. कुणाला तोडूनही बोलतात. पण मनातून त्यांना कार्यकर्त्यांच्या कामाची तळमळ अतिशय असते, हेही मी जवळून पाहिले आहे. ते एखादा शब्द कटू बोलतील, पण त्या कार्यकर्त्यांचे काम लक्षात ठेवून करूनही देतील, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेचा, अति औपचारिकतेचा राग आहे. फक्त कामाची व जनहिताची तळमळ आहे.

  दादा दौऱ्यावर आमच्याकडे यायचे, तेव्हा मुक्काम सर्किट हाऊसवरच करणार. कुणाच्या घरात वा फार्महाऊसला राहिलेत, असे होणारच नाही. तिथे सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरु होतो. एकीकडे जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांना कामाच्या आणि प्रकल्पांच्या स्थिती विषयीच्या सूचना देणार, एकीकडे कार्यकर्त्यांना भेटणार, कार्यकर्त्यांची निवेदने त्यांच्या हातात जमा होत असतात. ५० कागद असले, तरी संबंधित अधिकाऱ्याचा फोन आला की लगेच त्या अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या कामाबाबतचा कागद नेमका शोधून लगेच काम सांगणे हा त्यांचा स्वभाव आहे.

  अजितदादांचा आणि माझा कामाच्या दृष्टीने परिचय झाला तो १९९९ मध्ये. आम्ही दोघेही आमदार म्हणून निवडून आलो होतो. मी प्रथम आमदार झालो होतो. दादांची तिसरी टर्म होती. दादा राज्यातील मंत्रीमंडळात पाटबंधारे मंत्री झाले आणि आमच्या साताऱ्याचे पालकमंत्रीही! माझा मतदारसंघ उत्तर कराड हा थोर नेते यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ म्हणून पवार साहेबांना आणि अजितदादांनाही विशेष प्रिय. मी तिथला आमदार असल्यामुळे तिथल्या सर्व विषयांवर दादा माझ्याशी चर्चा करून निर्णय घेतात.

  आमच्याकडे म्हसकरवाडी घाटात एकदा एसटी बस कोसळली आणि त्यात पाच व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या. तेव्हा मोबाईल फोनचा इतका सुळसुळाट झालेला नव्हता. लँडलाईनवरून मी अपघाताची माहिती आमचे नेते व साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून दादांच्या कार्यालयात लगेच कळवली. पण संबंधित पीएने ती माहिती काही दादांपर्यंत पोचवली नाही. राहिली वा विसरला असेल तोही. पण दुसऱ्या दिवशी दादांचा कार्यक्रम नगर जिल्ह्याच्या दौऱ्याचा होता आणि गाड्या निघालेल्या असताना त्यांना रेडिओच्या बातम्यांतून अपघाताची माहिती कळाली. लगेच त्यांनी तौ दौरा तसाच सोडला. गाड्या साताऱ्याकडे वळवल्या आणि दुपारी ते आमच्याकडे कराडला आले. पालकमंत्री या नात्याने आपण अपघातग्रस्तांच्या नातलगांना भेटणे आणि जखमींची विचारपूस कऱणे हे दादांना अतिशय महत्वाचे वाटले होते. हा त्यांच्या एक निराळ्या स्वभावगुणाचा परिचय मला त्या निमित्ताने झाला. एसटी अपघाताची माहिती मिळता क्षणीच त्यांनी कराडकडे धाव घेतली, हे मला विशेष वाटते. त्यांच्या स्वभावातील ती एक ऋजुता व भावनिकता मला जाणवते.

  दादा बोलायला वागायला अनेकांना कडक वाटतात. तडक फडक ते बोलतातही. कुणाला तोडूनही बोलतात. पण मनातून त्यांना कार्यकर्त्यांच्या कामाची तळमळ अतिशय असते, हेही मी जवळून पाहिले आहे. ते एखादा शब्द कटू बोलतील, पण त्या कार्यकर्त्यांचे काम लक्षात ठेवून करूनही देतील, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या कृत्रिमतेचा, अति औपचारिकतेचा राग आहे. फक्त कामाची व जनहिताची तळमळ आहे.

  दादा दौऱ्यावर आमच्याकडे यायचे, तेव्हा मुक्काम सर्किट हाऊसवरच करणार. कुणाच्या घरात वा फार्महाऊसला राहिलेत, असे होणारच नाही. तिथे सकाळी सहा वाजता त्यांचा दिवस सुरु होतो. एकीकडे जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांना कामाच्या आणि प्रकल्पांच्या स्थिती विषयीच्या सूचना देणार, एकीकडे कार्यकर्त्यांना भेटणार, कार्यकर्त्यांची निवेदने त्यांच्या हातात जमा होत असतात. ५० कागद असले, तरी संबंधित अधिकाऱ्याचा फोन आला की लगेच त्या अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या कामाबाबतचा कागद नेमका शोधून लगेच काम सांगणे हा त्यांचा स्वभाव आहे, हे अनुभवातून सांगतो. मी पाहिलेय, की सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एका कार्यकर्त्याचे काम होते, त्या अधिकाऱ्याचा फोन दुसऱ्या कशासंदर्भात तिथे आला, ते बोलणे झाल्यावर त्यांना थांबवून दादांनी तो कागद शोधून कार्यकर्त्यांचा विषय मार्गी लावला. हे नेहमी होते. तोही त्यांचा स्वभावच आहे.

  माझ्या मतदारासंघात काही गावे उंच डोंगरी विभागात आहेत. तिथे शेतीच्या पाण्याची नेहमी तक्रार असते. तिथे पाणी पोहचावे, यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या काळापासून एका योजनेची मागणी लोक करत होते. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी १९९९ पासून त्या योजनेचा पाठपुरावा करत होतो. दादांनीच पाटबंधारे खाते संभाळताना ती उपसा सिंचन योजना मार्गी लावली. त्यात तंत्रिक अडचणी पुष्कळ होत्या. त्या सोडवत असताना, पाटबंधाऱ्याचा पैसा खर्च करण्यासाठी राज्यपालांच्या परवानगीचा आणि अनुशेषाचा मुद्दा पुढे आला. त्यातून तो प्रकल्प रखडत राहिला. फडणवीस सरकारच्या काळातही आम्ही पाठपुरावा करत राहिलो. पण तो प्रकल्प आता दादा उमपमुख्यमंत्री झाल्यावर मार्गी लागतो आहे. आमचे टीकाकार लोक आम्हाला बोलतात की, “काय न होणाऱ्या प्रकल्पाचे तुणतुणे बाळासाहेब तुम्ही वाजवत राहता?” आम्ही म्हणायचो की “तुणतुणेही वाजवणार आणि तो प्रकल्प करूनही घेणारच!” कारण आम्हाला दादांविषयी खात्री वाटत होती. त्यांनी सांगितले म्हणजे प्रकल्प होणारच. अरफळ कॅनालवरून धनगरवाडी हनबरवाडी लिफ्ट योजनेच्या माध्यमांतून आता त्या अडचणीच्या १५-१६ गावांना पाणी पोहोचणार आहे. दादांच्या चिकाटीने व प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेनेच तो प्रकल्प होतो आहे.

  दादांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाची पाहणी दादा स्वतः उभे राहून बारकाईने करतात हेही त्यांच्या काटेकोरपणाचे उदाहरण आहे. सकाळी लवकर ते बांधकामाच्या ठिकाणी जातात. एखाद्या भिंतीचा ओळंबा नीट धरलेला आहे की नाही, पायऱ्यांचे कोन व अंतर योग्य आहे की नाही, इमारतीच्या सौंदर्याला मारक काही भाग होत तर नाही ना, अशा बारकाव्याने ते सुरू असणारे बांधकाम पाहतात तेव्हा आश्चर्य वाटते.

  दादांचे वैशिष्ट्य म्हणजे वेळेच्या बाबतीत असणारा त्यांचा काटेकोरपणा. ठरलेल्या वेळेवर ते कार्यक्रमाच्या स्थळी पोचणार हे आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांना पाठच झाले आहे. त्यांच्या कष्ट करण्यालाही सीमा नाही. ते सतत सकाळपासून रात्रीपर्यंत जनसेवेच्या कामात मग्न राहतात. तरी ते वेळ कशी सांभाळतात, हे गूढ ज्यांनी त्यांच्या हातातील घड्याळ पाहिले त्यांच्यासाठी सुटते. तुम्हाला त्यांच्या काटेकोरपणाची प्रचिती ते घड्याळ देते. तुमच्या घडाळ्यात सव्वा दोन वाजलेले असतात तेव्हा दादांच्या घड्याळात दोन वीस वाजलेले असतात! कारण त्यांच्या हातातील घड्याळ हे पाच मिनिटे पुढेच ठेवलेले असते. त्यामुळे वेळेच्या पुढे विचार करणारा आणि नेमक्या वेळी चालणारा नेता म्हणजेच आमचे दादा, असेही म्हणता येईल…!

  बाळासाहेब पाटील

  सहकार मंत्री,  महाराष्ट्र राज्य