‘अजितदादा आमचे मार्गदर्शक’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितला अजित पवारांसोबत कामाचा रंजक किस्सा

अजितदादांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे नेणारा कर्तुत्ववान नेता या महाराष्ट्राला दादांच्या रुपाने मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. खरोखरच अजितदादा नावाप्रमाणेच दादा आहेत. मोठ्या भावाप्रमाणे त्यांची सदैव साथ व मार्गदर्शन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सदैव मिळालेली आहे.

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रशासनातील जबरदस्त पकड, आक्रमकता, रोखठोपणा, स्पष्टवक्तेपणा या अष्टपैलू गुणांमुळे अजितदादा राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे आयडॉल आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना दादांनी ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण या सूत्रानुसार आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. दादांच्या या सूत्राचा अवलंब करून आम्ही जनतेच्या सेवेला प्राधान्य देत आहोत.

  दादांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अजितदादा एक बहुआयामी आणि पारदर्शक राजकीय व्यक्तिमत्व आहे. सत्ता असो अथवा नसो, दादांची लोकप्रियता महाराष्ट्रात कायम आहे. सत्तेत नसतानाही दादांभोवती नेहमी आढळणारा कार्यकर्त्यांसह जनतेचा समूह त्यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची साक्ष देतो. शरद पवार यांच्या स्वप्नातील पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराच्या या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर कसे ठेवता येईल, यासाठी अजितदादांनी घेतलेले अनेक महत्वपूर्ण निर्णय कौतुकास्पद आहेत.

  महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार, साहित्य, क्रीडा, ऊर्जा, शेती, उद्योग याची खडानखडा माहिती दादांना असते. शरद पवारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर वेगळी छाप निर्माण केलेली आहे. तळागाळातील सामान्य माणसांपासून ते बड्या लोकांपर्यंत सर्वांचे प्रश्न ते धडाडीने सोडवत असतात. त्यांचे संघटन कौशल्य, धडाडी, तत्परता, नेतृत्वगुण व प्रशासनावरील पकड याचे कौतुक शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांपासून ते त्यांचे विरोधकही खुल्या मनाने मान्य करतात, हेच अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचे मोठे यश आहे. पोटात एक आणि ओठावर दुसरेच, या राजकीय समीकरणाला दादांनी छेद दिला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कुटुंबातूनच उत्तम संस्कारा बरोबरच शेती, राजकारण, समाजकारण यांचे संस्कार त्यांच्यावर खऱ्या अर्थाने झाले. त्यामुळेच शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या न्यायासाठी दादांची नेहमी तळमळ असते‌. सामान्यांच्या प्रश्नाला त्यामुळेच दादा प्राधान्य देत असतात‌‌.

  गेल्या २५ वर्षात कृषी, फुलोत्पादन, जलसंधारण, पाटबंधारे, ग्रामविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ऊर्जा ही खाती सांभाळताना त्यांनी प्रत्येक खात्यावर आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सध्या उपमुख्यमंत्रीपदासह अर्थ व नियोजन खात्याचा कारभार सांभाळत असताना कोरोनामुळे महाराष्ट्रापुढे अनेक आव्हाने होती, मात्र दादांनी या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी दादांनी आम्हा मंत्र्यांसह विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. १८-१८ तास काम करून सकाळी सात वाजता जनता दरबारात अजिबात न थकता प्रचंड उत्साहाने अजितदादा जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे सामान्यांच्या व्यथा जाणणारे हे खरेखुरे दादा आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत असताना त्यांनी अत्यंत गतिमान प्रशासन दिले. कोरोनाच्या काळातही त्यांनी कामाचा धडाका कायम ठेवला. कोणतीही कामे व फायली विनाकारण रखडत ठेवल्या नाहीत. शरद पवार यांच्या विचारांवर वाटचाल करत त्यांनी सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू मानला. त्याच्याच विचारधारेप्रमाणे शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती, बी-बियाणे, फळबागा व उद्योग क्षेत्राला प्राधान्य दिले. महाराष्ट्र फळबागा व अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. दुग्ध उत्पादन व पशुपालनात महाराष्ट्राने गरुडझेप घेतली, याचे श्रेय अजितदादांच्या निर्णयाला जाते. महिलांच्या बाबतीतही त्यांचे उदारमतवादी व पुरोगामी धोरण आहे. स्त्री- पुरुष समानता, धर्मनिरपेक्षता आणि समानता या लोकशाही मूलभूत तत्वाचे संस्कार दादांवर घरातच रुजले आहेत. आम्ही आमच्या राजकीय व सामाजिक जीवनात दादांच्या या मूलभूत तत्त्वाचा अंगिकार करून कार्यरत आहोत.

  खरंतर अजितदादांची राजकीय कारकीर्द इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली. माझ्याही राजकीय जीवनाची सुरुवात याच कारखान्याच्या संचालक पदापासून झाली. महाराष्ट्रात जे नामवंत सहकारी साखर कारखाने आहेत, यामध्ये छत्रपती साखर कारखान्याचा  उल्लेख प्राधान्याने केला जातो. सुरुवातीपासूनच शरद पवार व दादा यांच्या नेतृत्वावर मी निष्ठा ठेवलेली आहे. त्यामुळे जनसेवेला कायम प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याची दादांची भूमिका माझ्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आत्मसात केलेली आहे. ज्या छत्रपती साखर कारखान्याचा संचालक मी होतो, त्याच कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला मिळाली, हे केवळ शरद पवार व दादा यांच्यामुळे शक्य झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाची अनेक वर्षे जबाबदारी त्यानंतर या बँकेचे अध्यक्षपद मला मिळाले. अजितदादांच्या नतृत्वाखाली काम करत असताना त्यांच्याकडून खूप काही चांगल्या गोष्टी मला शिकण्यास मिळाल्या. सर्वसामान्यांना जोडण्याचे काम मी प्राधान्याने केले. मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दादांमुळे मिळाली. मिळालेल्या पदाचा उपयोग नेहमी सर्वसामान्यांच्या हितासाठी आपण करत आलो आहोत,हीच शरद पवार व‌ दादांची आम्हाला शिकवण आहे.

  शरद पवार, अजितदादा व सुप्रियाताई यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्याचा आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इंदापूर तालुक्यातील जनतेने ही मनापासून साथ दिली. सध्या राज्य मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक बांधकाम, वने, मृद, जलसंधारण, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यासह सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. शरद पवार व अजितदादांचे नेहमी मार्गदर्शन मला असते. अजितदादांबद्दल खूप काही लिहिण्यासारखे आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे नेणारा कर्तुत्ववान नेता या महाराष्ट्राला दादांच्या रुपाने मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्याला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. खरोखरच अजितदादा नावाप्रमाणेच दादा आहेत. मोठ्या भावाप्रमाणे त्यांची सदैव साथ व मार्गदर्शन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सदैव मिळालेली आहे. अशा या अष्टपैलू नेतृत्वाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना!

  दत्तात्रय भरणे

  राज्यमंत्री,  जलसंधारण महाराष्ट्र राज्य