“उमदा सहकारी, बाणेदार नेता” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अजित पवारांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा

स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पाहतात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडतात. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे काय, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करतात. त्यासाठी अशा प्रश्नांची उत्तरेही ते थेटपणे मिळवतात. त्यामध्ये भीडभाड ठेवत नाहीत. पण निर्णयही ठोस आणि तडकपणे घेतात.

  महाआवास-ग्रामीण योजनेचा शुभारंभाचा कार्यक्रम होता. स्वागत-प्रास्ताविकात सूत्रसंचालिकेने माझ्या नावासमोर अनेक विशेषणे जोडली. पुढे शिरस्त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या आधी बोलण्याची अजित पवार यांची वेळ आली. कोपरखळी मारण्यात दादा पटाईत. त्यांनी सुरवातच मिश्किलपणेगालात हसत हसतच केली… ‘माझ्या नावासमोर लावण्यासारखं तसं काही नाही. म्हणून थेटच बोलायला सुरू करतो.’  त्यानंतर माझे भाषण. मी सुरवात करताना त्यांचे नाव घेण्यापुर्वी‘महाराष्ट्राचे.. आपले लाडके..उपमुख्यमंत्री’ अशी केली. त्यावर दादांनीही खळाळून दाद दिली. असे आहेत, आपले दादा. उपमुख्यमंत्री अजित पवार.

  महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखतो. ते आहेतही तसेच. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गूण आहे. ते चाणाक्ष आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पवार कुटुंबीयांशी जुने-जिव्हाळ्याचे स्नेहबंध आहेत. राजकारणातले अजितदादा म्हणून त्यांना मी आणि मला ते नव्याने ओळखतात, असेही नाही. पण आम्हा दोघांसाठी एक अनोखा योग जुळून आला. तो महाविकास आघाडी सरकारच्या निमित्ताने. मंत्री म्हणून, मंत्रालयातील, विधीमंडळातले आणि शासन-प्रशासनातील सहकारी म्हणून मला त्यांची नव्याने ओळख झाली. ते यापुर्वीही मंत्री होते. पण त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता अनुभवतो आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना मी जवळून पाहतो आहे.

  तीन पक्षाचे-आघाडीचे सरकार म्हणून सगळ्यांनाच शासन-प्रशासनातील संवाद-समन्वयाबाबत कुतूहल असते. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यातील संबंध या अंगानेही चर्चा होते. यात उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्तमंत्री म्हणून अजितदादा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याविषयीही बोललं जातं. पण हे सगळे त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे आणि निर्णयक्षमेताच्या संदर्भाने पुढे येत राहते.

  आघाडी सरकार सत्तेत आले आणि सहा महिनेही लोटले नाही. तोवर संपूर्ण मानवजातीवरच कोरोना-विषाणूने हल्ला केला. आपल्या महाराष्ट्रावरही गंभीर परिस्थिती ओढवली. निसर्ग आणि तौक्ते वादळाने, अवेळी पावसानेही महाराष्ट्राची सत्वपरिक्षाच घेतली आहे. पण यातही आपण न डगमगता, खंबीरपणे उभे राहू शकलो आहोत.

  सरकार तीन पक्षाचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. राज्याला कोरोना विषाणूचा हल्ला, वादळाचे संकट यातून सावरणे आणि दुसरीकडे बिघडलेली आर्थिक घडी बसवणे यासाठीचे निर्णय वेगाने आणि वेळेवर घ्यावे लागले. त्यामध्ये राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी विकास कामांना खीळ बसू नये यासाठी मोठ्या हातोटीने निर्णय घेतले. यामध्ये राज्यातील आरोग्य सुविधांमध्ये झपाट्याने वाढ करावी लागली. औषधे, उपचारासाठी आवश्यक उपकरणे यांच्या खरेदीबाबत आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अधिकारांचे विकेंद्रीकरण यासाठीचे निर्णय तातडीने घेण्यात आले. निसर्ग, आणि चक्री वादळांच्या नुकसान भरपाईबाबतही तत्परतेने निर्णय घेण्यात आला. या सगळ्यासाठी लागणारा निधी असो किंवा अलिकडेच आम्ही कोरोनामुक्त गाव संकल्पना राबविण्यासाठी गावा-गावांसाठी पारितोषिकांची योजना सुरु केली. आरोग्य, कृषी, उद्योग आणि राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून मला, मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांच्या योजना-उपक्रमांना उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले आहे. त्यामुळेच आपण कोरोनासह, नैसर्गिक आपत्तीच्या मालिकेत महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही, अशी पावले टाकू शकलो आहोत.

  परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्याविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असते. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडण्याचा अपवाद केला नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडतात. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला येतो.

  स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पाहतात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडतात. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे काय, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करतात. त्यासाठी अशा प्रश्नांची उत्तरेही ते थेटपणे मिळवतात. त्यामध्ये भीडभाड ठेवत नाहीत. पण निर्णयही ठोस आणि तडकपणे घेतात.

  विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असते. त्यांनाही ठणकावयाला, गोष्टी समजावून घ्या, हे सांगायला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नाही. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असतो. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतर, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असते. महाराष्ट्र हित आणि त्यासाठी व्यापक विचार करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये भिनली आहे.

  उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची असा जवळचा उमदा सहकारी म्हणून झालेली ओळख पुढच्या वाटचालीत निश्चितच लक्षात राहील, हे मात्र मान्य करावे लागेल. बाणेदार, दमदार अशा अजितदादांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे, अशीही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

  • उद्धव बाळासाहेब ठाकरे

  मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य