अजितदादा आणि ते ८० तासांचे सरकार, काय घडलं त्या रात्री?

अजितदादा पवार हे नाव उच्चारताच आपल्या मनात पहिला भाव जो जागतो तो असतो एक करडेपणा, एक कडवेपणा आणि एक कडकपणा. राजकारणात त्यांना जे जे लोक पाहतात, त्यांच्याशी मित्रत्वाने वा शत्रुत्वाने वावरतात त्या सर्वांचेच या तीन मुद्द्यांवर एकमत असते. अजितदादा हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे इतकीच त्यांची ओळख आहे का, तर तसे नक्कीच नाही. पवार हे आडनाव विशेष आहेच. पण त्याचे महत्व आणखी वाढवणारे दादापणाचे कर्तृत्व त्यांनी दाखवले आहे. सिद्धही केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. तो कितपत यशस्वी झाला हे मात्र पुढच्या काळात जो इतिहास लिहिला जाईल त्याच वेळी सांगता येईल.

  अजितदादा पवार हे नाव उच्चारताच आपल्या मनात पहिला भाव जो जागतो तो असतो एक करडेपणा, एक कडवेपणा आणि एक कडकपणा. राजकारणात त्यांना जे जे लोक पाहतात, त्यांच्याशी मित्रत्वाने वा शत्रुत्वाने वावरतात त्या सर्वांचेच या तीन मुद्द्यांवर एकमत असते. अजितदादा हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे इतकीच त्यांची ओळख आहे का, तर तसे नक्कीच नाही. पवार हे आडनाव विशेष आहेच. पण त्याचे महत्व आणखी वाढवणारे दादापणाचे कर्तृत्व त्यांनी दाखवले आहे. सिद्धही केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. तो कितपत यशस्वी झाला हे मात्र पुढच्या काळात जो इतिहास लिहिला जाईल त्याच वेळी सांगता येईल.

  अजितदादा हे नाव ९० च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात चमकू लागले. त्या आधी ते  पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा बँकेत कार्यरत होते. १९९० च्या निवडणुकीत ते बारामतीचे खासदार बनले. शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचे होते आणि त्याचवेळी त्यांना बारामतीची खासदारकी काकडे वा अन्य विरोधकांकडे जाऊ द्यायची नव्हती. त्यातून अजितदादांकडे खासदारकीची काँग्रेसची उमेदवारी आली. पण ती निवडणूक फारच विचित्र होती. मतदानाच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष, मावळत्या लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि त्या निवडणुकी आधीची देशाची स्थिती पाहता देशाचे नेतृत्व नक्कीच ज्यांच्याकडे पुन्हा आले असते ते राजीव गांधी, अचानक राजकीय पटलावरून अदृष्य झाले. त्यांची भीषण हत्या श्रीलंकन अतिरेक्यांनी घडवली आणि देश हादरला. नंतर काँग्रेसच्या राजकारणाचाही सूर पालटला. पंतप्रधानपदाची संधी नरसिंहरावांकडे आली. खरेतर शरद पवारांकडेही ती संधी येऊ शकली असती. पण ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. पुढच्या दीड वर्षातच रावसाहेबांनी पवारांना आग्रहाने दिल्लीला नेले. संरक्षण मंत्रीपद त्यांच्याकडे दिले.  आणि मग बारामतीत दोन पोट निवडणुका झाल्या. शरदरावांनी आमदारकीचा तर अजितदादांनी खासदारकीचा राजीनामा दिला. खासदारकी काकांकडे सोपवून अजितदादा विधानसभेत गेले. अजितदादा हे सुधाकरराव नाईकांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री बनले. पण तो सारा काँग्रेस अंतर्गत संघर्षाचा उलथा पालथीचा आणि देशातीलही मोठ्या घडोमोडींचा काळ होता.

  सुधाकर नाईकांना असे वाटत होते की शरदराव आपल्याला राज्य करू देत नाहीत. त्यांनी अचानक पवारांच्या गटातील मानल्या जाणाऱ्या बारा मंत्र्यांची हकालपट्टी केली. त्यात एक अजित पवारही होते. पाठोपाठ अनेक विचित्र आणि मोठ्या घटना घडल्या. रावसाहेबांच्या पंतप्रधानपदाचा काळ देशासाठीही कसोटीचा होता तसाच, तो मुंबईसाठीही महाकर्मकठीण होता. बाबरी मशीद पडली, मुंबईत आणि देशभरात दंगे उसळले आणि मुंबईतील उद्योजक दिल्लीत धडकले. त्यांनी रावसाहेबांना सांगितले की मुंबई सावरा नाही तर कठीण होईल. त्यांनी तातडीने नाईकांना हटवले आणि शरद पवारांकडे पुन्हा एकदा राज्याची सूत्रे दिली. अजितदादा हे त्या काळात साधे आमदार होते. पण काकांच्या बरोबर वावरत होते. शिकत होते. त्यांच्या बरोबर आर. आर. पाटील, दिलीप वळसे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, जयंत पाटील असे अनेक तरूण आमदारही त्या विधानसभेत पुढच्या जबाबदाऱ्यांसाठी तयार होत होते. या साऱ्या तरुणांचे नेतृत्व अजितदादांकडे आपोआप येत गेले.

  पुढची पाच वर्षेही दादांसह या साऱ्यांनाच विरोधी बाकांवर काढावी लागली. कारण मुंबईतील दंगली व बॉँब स्फोटानंतर या शहराची मानसिकता बदलली. राज्यात शिवसेनेबरोबरच भारतीय जनता पक्षाचे समर्थक वाढले होते आणि काँग्रेस मतदारांची संख्या घटत चालली होती. त्या काळात विधानसभेत अनेक लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नांमध्ये अजित पवार हे नाव झळकत असायचे. कारण विधिमंडळाच्या कामकाजात सुरुवातीपासून ते सभागृह बंद होईपर्यंत थांबून भाग घेणे, चर्चा ऐकत राहणे हा गुण दादांनी अंगी बाणवला होता. तीही शिकवण अर्थातच काका शरदरावांची असावी. काकांचा आणखी एक गुण अजितदादांनी उचलला तो म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत भरपूर काम करणे हा. सकाळी ७ वाजता ते दिवस सुरु करतात. म्हणजे त्यांच्या भेटीगाटीच्या अपॉंटमेंट सकाळी ७ पासून सुरू असतात. तत्पूर्वी ते स्वतःचे आवरून ब्रेकफास्ट करून तयार असतात!

  ते उपमुख्यमंत्री असताना नागपूर अधिवेशन काळात सुयोग पत्रकार निवासात राहणाऱ्या मुंबईच्या काही निवडक पत्रकारांना दादांनी ब्रेकफास्टला बोलावले. वेळ सकाळी ७ वाजता!  पत्रकारांना इतक्या सकाळी कुठे जाणे हे जिवावरचे संकट वाटल्यास नवल नाही. कारण आपला सामान्यांचा दिवस सकाळी ७ वाजल्या शिवाय उगवतच नाही. पण तरीही धाडस करून आम्ही काही लोक तिथे पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर दुपाराचे बारा वाजल्यासारखी लगबग सुरु होती. सारे पीए कर्मचारी झाडून हजर होते. कारण दादा स्वतः कामाला लागलेले होते. ब्रेकफास्टसाठी काय पदार्थ आणलेत याकडेही त्यांचे बारीक लक्ष होते. बारामतीहून आलेले लाडू (तेव्हा दिवाळीनंतरचा माहोल होता) पानात आले का हे ते पहात होते. कुणाला चहात कमी साखर लागते, हे त्यांना बरोबर ठाऊक होते…! उत्तम यजमान उत्तम नेता म्हणजे दादा हे जाणवले.

  शिस्त आणि टापटीप याचाही त्यांचा कटाक्ष वाखाणण्यासारखा आहे. कुठे कोपऱ्यात चहाचा कप राहिला आहे, कुठे एकादा नॅपकीन चुरगळून पडला आहे याकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे आणि स्टाफलाही हाक मारताना, ‘एक्सक्यूज मी’, असे सौजन्याने ते पुकारत होते. अर्थात त्यांच्या कडवेपणाचा व करारीपणाचा अनुभव घेतलेले कर्मचारी एक्सक्यूज मी ही हाक ऐकून चळाचळा कापत असल्यास नवल नाही! सकाळी ७ ला सुरू होणारा दादांचा दिवस रात्री  संपणार कधी हे मात्र निश्चित नसते. मध्यरात्री नंतरही गाठीभेटी सुरुच राहतात !

  १९९९ मध्ये जेव्हा काँग्रेसच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे व अन्य मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले तेव्हा त्या सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी दादांवर पुन्हा एकदा आली आणि तेव्हापासून पक्षातील त्यांचा प्रभावही वाढू लागला. काँग्रेसचे विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री असे ते सरकार स्थापन झाले. त्याही वेळी सरकारच्या रचनेत दादांच्या शब्दाला वजन होते. पुणे जिल्ह्यातील अपक्ष आमदार हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रीमंडळापासून लांब ठेवण्याचा दादांचा हट्ट सफल झाला होता. विलासरावांनी पक्षासाठी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर राष्ट्रवादीमध्येही खांदेपालटाची वेळ आली. तेव्हा विजयसिंह मोहिते उपमुख्यमंत्री झाले. सुशिलकुमार मुख्यमंत्री होते. दादांच्याकडे महत्वाची खाती येत गेली.

  त्याचवेळी पुढच्या निवडणुकीतील उमेदवार ठरवण्याच्या पक्षाच्या लहान समितीमध्ये दादांची भूमिका मोठी राहिली. त्या निवडणुकीनंतर २००४ मध्ये राष्ट्रवादीकडे काँग्रेस पेक्षा अधिकची आमदार संख्या होती आणि राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री होणे शक्य होते. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकची मंत्रीपदे घेत मुख्यमंत्रीपद पुन्हा काँग्रेसकडेच सोपवले. दादांचे महत्व वाढताना तेव्हाही दिसत होते जर राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले तर ते दादांना मिळणार अशी अटकळ बांधली जात होती. पण तो विषय शरद पवार यांनी निराळ्या पद्धतीने सोडवला. अधिकची दोन मंत्रीपदे राष्ट्रवादीकडे आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या नंतरच्या दहा वर्षांच्या काळात दादांचा पक्षावरील आणि सरकारवरील प्रभाव हा सतत वाढता राहिला. राष्ट्रवादीचे सारे मंत्री त्यांचा सल्ला घेऊन काम करत होते. पक्षाचे अध्यक्ष ठरवणे अन्य पदाधिकारी ठरवणे यात दादांचा शब्द अंतिम होता. उमेदवाऱ्या देणे वा काढणे हाही भाग त्यांच्याचकडे राहिला.

  नरिमन पॉईंटचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अद्यावत करणे, तिथे शिस्त लावणे हेही काम दादांमुळेच शक्य झाले असे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते सांगतात. मेट्रोच्या कामासाठी नरिमन पॉईंटची सर्वच पक्षांची कार्यालये पाडली गेली. त्यांना बेलॉर्ड इस्टेट इथे नवे कार्यालय मिळाले. तिथेही दोन मजली कार्यालयाची रचना, कोण कुठे बसणार, यात दादांचा सल्ला महत्वाचा ठरला. नरिमन पॉईंट असो वा बेलॉर्ड इस्टेट असो तिथे सत्तेत असतील वा विरोधात बसले असतील, तरी दादा हे ठरलेल्या दिवशी येणारच हा शिरस्ता कायम राहिला. गंमत म्हणजे दादा स्वतःचा दिवस सकाळी ७ वाजता सुरु करतात. त्यामुळे ते साडेसात वाजता लोकांना भेटण्यासाठी राषट्रवादी भवनात येतात. त्यांना भेटण्यासाठी लांब लांबून येणारे लोकही सकाळी सातच्या आधी दक्षिण मुंबईच्या टोकाकडील राष्ट्रवादी भवनात हजर राहतात आणि एक दोन नव्हे प्रत्येक मंगळवारी दादांच्या भेटीसाठी शेकडो कार्यकर्ते, सामान्य नागरिक ऱाष्ट्रवादी भवनात हजर असतात. आजही तोच शिरस्ता कायम आहे.

  साहेब, दादा आणि ताई

  पवार कुटंबाची राजकारणावर जितकी घट्ट पकड आहे तितकेच ते कुटुंब एकसंघ राहिले आहे. माध्यमांनी कितीही वादाची चित्रे रंगवली तरी खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे, केंद्रीय नेतृत्व असणारे शरदराव पवार आणि अजितदादा पवार यांच्यात कुठेही व्यक्तीगत हेवेदावे वा इर्षा स्पर्धा नाही. पवार कुटंबाची दिवाळी हा सर्वत्र कौतुकाचा व औत्सुक्याचाही भाग आहे. शरदरावांचे पाच भाऊ आणि तीन बहिणी, त्यांच्या लेकी, सुना, जावई, नातवंडे असा फार मोठा गोतावळा. हे सारे पवार जगात अनेक देशांत मोठ्या पदांवर काम करतात. ते सारे दिवाळीच्या चार दिवसांत बारामती जवळच्या काटेवाडीतील जुन्या घरात एकत्र जमतात. तिथे त्यांची दिवाळी थाटात पारंपारिक पद्धतीने साजरी होते. अजितदादा ही तिथे रमत असतात. शरद पवारांच्या बोलण्यातून दादांविषयीचे कौतुक अनेकदा प्रकट होते आणि ताईंविषयीचा जिव्हाळा दादांच्या बोलण्यातून डोकावतो. पवार घराण्याला जिव्हाळा आणि आपलेपणाची देणगीच आहे.

  दादांचे ते तीस तास

  23 नोव्हेबंर 2019 रोजी राज्यात राजकीय भूकंप झाला होता. त्या आधल्या रात्री पासून अजितदादा पवार आणि त्यांचे निकटवर्ती सोळा सतरा आमदार हे गायब झाले होते. वर्षा निवासस्थानी त्यांची व देवेन्द्र फडणवीस यांच्या भेटी झाल्या, खलबते शिजली. दिल्लीला फोनाफोनी झाली. राजभवनाचेही दिवे रात्रभर तेवते होते. रातोरात राष्ट्रपती राजवट उठली. फडणवीस व दादंना सरकार स्थापन कऱण्याचे निमंत्रण मिळाले आणि सकाळी सात आठ वाजेपर्यंत दादा उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असे एक सरकार स्थापनही झाले. त्याच्या बातम्या पहाटेपासून फिरू लागताताच शरद पवार हे खवळून उठले. त्यांनी सारी ताकद पणाला लावून दादांच्या बरोबर फुटणारे धनंजय मुंडेंपासून ते नरहरी झिरवळ पर्यंतचे सारे आमदार त्या चोवीस तासात परत खेचले. ते सारे पवार साहेबांपुढे हजर होताच, फडणवीसांचे सरकार टिकत नाही हे स्पष्ट झाले. दोन तीन आमदार जयपूरला धडकले होते त्यांनाही गुप्तपणाने धरून मुंबईला आणले गेले.

  दादांचे ते बंड तो भाजपा बरोबरच्या सरकारचा प्रयोग फसला. उधळला गेला. पण त्या तीस पस्तीस तासात नेमके काय काय झाले, आणि ते का झाले, याचे गूढ आजही कायम आहे. अजितदादा , देवेन्द्र फडणवीस आणि शरद पवार ही त्या नाट्यातील प्रमुख पात्रे नेमके काय घडले व का घडले, यावर बोलणार नाहीत तोवर, हे गूढ महाराष्ट्राला छळतच राहणार आहे.

  अनिकेत जोशी