दमदार, कर्तबगार – आपले दादा

अजित पवार यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस वयाने दहा वर्षांपेक्षा लहान असले तरी ते देवेंद्र यांना विरोधी पक्ष नेता या नात्याने गांभीर्यानेच घेत आले. विरोधी पक्षात चांगला मित्र लागतो असे ते नेहमी म्हणतात. वेळप्रसंगी भांडा पण द्वेष नको यावर विश्वास असणारा हा नेता ग्रामीण महाराष्ट्राचा नेहमीच विश्वासपात्र राहिला आहे.

    महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मराठा घराण्यांचा दबदबा राज्याच्या निर्मितीपासून असला तरी पवार घराण्याची पॉवर मात्र इतरांच्या तुलनेत अधिकच दिसली. शरद पवार यांनी आपल्या कामाचा ठसा राज्यात उमटवून ते देशाच्या राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी पवार कुटुंबातील एक उगवता तारा त्यांच्या राजकीय आसमंतात दिसू लागला. अजित पवार नावाचा हा तारा भविष्यात शरद पवारांचा राजकीय वारस ठरू शकतो, अशीही चर्चा मग रंगू लागली. पण शरद पवार यांनी मात्र माझा वारस घरातील वा घराबाहेरील असू शकतो, असे स्पष्ट करीत होणा-या चर्चेतील हवाच काढून टाकली. त्यानंतर मात्र पवारांच्या वारसदारावर राज्यात फारशी चर्चा झाली नाही. अजित अनंतराव पवार हे नाव राज्यातील जे मूठभर नेते नेहमी चर्चेत असतात त्यातील एक नाव. शरद पवार यांचे ते पुतणे जरी असले तरी त्यांचे राज्यातील अफाट कर्तृत्व पहिले तर स्वबळावर उभे होणा-या नेत्यांच्या पंक्तीत मात्र ते नक्कीच बसू शकतात. अजित पवारांचे राजकीय जीवन तपासले तर ते राजकारणात एकदम धूमकेतू समान उतरले असा भागच नाही.

    अजित पवार यांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस वयाने दहा वर्षांपेक्षा लहान असले तरी ते देवेंद्र यांना विरोधी पक्ष नेता या नात्याने गांभीर्यानेच घेत आले. विरोधी पक्षात चांगला मित्र लागतो असे ते नेहमी म्हणतात. वेळप्रसंगी भांडा पण द्वेष नको यावर विश्वास असणारा हा नेता ग्रामीण महाराष्ट्राचा नेहमीच विश्वासपात्र राहिला आहे.

    मेणावून मऊ मनाचे

    अजित दादा अँग्री यंग मॅन आहेत वगैरे त्यांच्या संदर्भात बोलले जाते व सांगितले जाते. पण ते खरंच तसे आहेत काय? तर या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या संदर्भातील एक दोन प्रसंगाचे अवलोकन केले असता, नाही हेच द्यावे लागेल. अजितदादा म्हणजे मुरलेल्या लोणच्यासारख्या नेत्यांसमान अजिबात नाहीत. त्यांच्या जे ओठात तेच त्यांच्या पोटात यापेक्षा वेगळे नाहीत. जे काम होत असेल ते मग कुठल्याही स्थितीत करून ते मोकळे होतात अन न होणा-या कामासाठी हो म्हणून ते कुण्या कार्यकर्त्याला फिरवीत नाहीत. बोले तैसा चाले या संत नीती समान त्यांचे धोरण असल्यामुळे अनेकांच्या ते पचनी पडले नाही अन पडणार नाही. थोरल्या पवारांच्या संदर्भात ते मात्र अतिशय भावनात्मक आहेत. कुठले निर्णय जर दादांनी घेतले अन ते थोरल्या पवारांना आवडले नाहीत तर अजितदादा घेतलेले निर्णय त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी कितीही मोठे असले तरी ते मग त्यांना मागे घेतात. अजितदादा यांचे अंतरंग मेणावून मऊ असल्याचे मत त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी व्यक्त केले आहे. एकदा एका सभेत थोरले पवार त्यांच्यासमवेत होते. थोरल्या पवारांच्या संदर्भात एका प्रसंगावर बोलतांना ते गहिवरले. थोरले पवारही मग भावुक झाले. अजित दादांचे कबड्डी सहयोगी फिदाभाई शेख यांचे निधन झाले तेंव्हा ते अतिशय भावुक झाले. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन करतांना दादा अतिशय गहिवरले होते.

    थेट भिडणारा नेता

    कोरोनामुळे जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाराष्ट्राची स्थितीही त्याला अपवाद नाही. अजितदादा कोरोनाने बिकट झालेल्या स्थितीबाबत स्पष्टच बोलले. ते हातचे राखून बोलतच नाहीत. ते म्हणाले लोकांनी सरकारपासून अर्थसंकल्पात फार अपेक्षा ठेऊ नयेत. गोडगोड बोलून धक्का देणे त्यांच्या सातबा-यात बसत नाही. जेवढे करता येईल तेवढे करण्याचे प्रयत्न ते अखेरपर्यंत करतात. जे शक्य झाले नाही, ते सरळ सांगून टाकतात. इतर राजकारण्यासारखे ताकाला जाऊन भांडे लपविण्याचे काम त्यांनी कधीच केले नाही अन ते करणारही नाहीत. कोरोनाच्या पिक पिरेडमध्ये ते राज्यव्यापी लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी फिरले. स्थानीय प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांनी कोरोनाग्रस्त महाराष्ट्राला जमेल तेवढा दिलासा देण्याचे काम केले. स्वतःच्या तब्बेतीकडे लक्ष न देता त्यांनी महाराष्ट्राला सावरण्याचे जे काम केले त्याला तोडच नाही. अखेर कोरोना त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी स्वतःच ही माहिती मग राज्याला दिली. लोकांनी खचून जाऊ नये म्हणून त्यांनी माझी प्रकुती उत्तम असल्याचा संदेशही राज्याला दिला होता. कोरोना होण्यापूर्वी ते बारामती दौ-यावर होते. अवकाळी पावसाने जबरदस्त हानी झाली होती. नुकसानग्रस्त शेतक-यांना ते भेटले. त्यांच्या पिकांची पाहणी केली. त्यानंतर ते सोलापूरला व पंढरपूरला गेले. तेथेही त्यांनी शेतक-यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांना दिलास दिला. लोक कल्याणाची  पोपटपंची न करता थेट भिडून जाणारा हा नेता महाराष्ट्रात विरळाच.

    धनराज गावंडे

    dhanraj.gawande@navabhartmedia.com