मूर्तिजापूरातील आणखी १० जण पॉझिटिव्ह!

  • कोरोनाचा हैदोस सुरूच

मूर्तिजापूर (Murtijapur) : अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा हैदोस सुरुच असून सोमवार, २८ सप्टेंबर रोजी सर्वोपचारमधून प्राप्त अहवालांमध्ये ५९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७२८८ झाली आहे. या ५९ पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये एकट्या मूर्तिजापुरातील १० जणांचा समावेश आहे. अर्थात मूर्तिजापुरला कोरोनाने आपला विळखा आणखी घट्ट केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, रविवारी कोरोनामुळे निधन झालेल्या एक रुग्णाची सोमवारी नोंद घेण्यात आल्यामुळे मृतकांचा आकडा वाढून २२६ वर पोहचला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाच्या प्रयोगशाळेकडून सोमवारी कोरोना चाचण्यांचे २५२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५९ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. १९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मूर्तिजापूर येथील १० जणांसह सिंधखेड, गौरक्षण रोड, विठ्ठल नगर व जीएमसी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, सिव्हील लाईन, वडाळी देशमुख, अकोट, तेल्हारा, शास्त्री नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, टी फॅक्टरी, पोळा चौक, बोरगाव मंजू, बाळापूर, लहान उमरी, अकोली जहागीर, गोडबोले प्लॉट, गोकुळ कॉलनी, ओझोन हॉस्पिटल जवळ, जोगळेकर प्लॉट, मलकापूर, डाबकी रोड, जठारपेठ, शिवाजी नगर, कपिला नगर, व्यंकटेश नगर, शास्त्री नगर, पिंपरी, धामोरी, भगोरा, सिरसो, निसर्ग अर्पाटमेन्ट व गुडधी येथील प्रत्येकी एक अशा ५९ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७२८८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तब्बल ५४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत २२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १६३० ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये १६ पॉझिटिव्ह
सध्या अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग चाचणीसाठी रॅपिड अँटीजन टेस्ट मोहीम राबविण्यात येत आहे. यात रविवारी दिवसभरात झालेल्या १५९ चाचण्या झाल्या त्यात १६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तेल्हारा येथे ११ चाचण्यांमध्ये एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आयएमए येथे ४६ चाचण्यांमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७ चाचण्यांमध्ये ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजपर्यंत जिल्ह्यात १६,८०० चाचण्या झाल्या. त्यात ११४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.