अकोला जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर डॉ. राजकुमार चौहान
अकोला जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर डॉ. राजकुमार चौहान

  • ९ दिवसांत गेले १६ जणांचे बळी!

अकोला (Akola) :  गेल्या सहा महिन्यांच्या काळात जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पाय पसरलेल्या कोरोनाचा कहर आता कमी होत चालला असून, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण घटले असले तरी बेफिकिरी करून चालणार नाही, प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर डॉ. राजकुमार चौहान यांनी केले आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरूवातीच्या नऊ दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १६ जणांचे बळी घेतल्याने, बाधितांचे प्रमाण कमी असले तरी मृत्यूचा आलेख अजूनही चढताच असल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. चौहान यांनी हे आवाहन केले आहे.

अकोला जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केल्यापासूनच्या गेल्या सात महिन्यांच्या काळात सप्टेंबर महिना बाधित रूग्ण आणि कोरोनाबळींची संख्या यासंदर्भात घातक ठरला. ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीचे नऊ दिवस पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दाखवीत असले, तरी मृत्यूचे सत्र कायम असून, या नऊ दिवसांच्या काळात १६ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अजूनही चिंतेतच आहे. दोन्ही यंत्रणा कोरोनावर नियंत्रणासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत, परंतु त्यासोबतच जनतेचीही साथ महत्वाची आहे. सप्टेंबरमध्ये दररोज सरासरी दोन ते तीन रुग्णांचे बळी आणि शंभरपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आले. ऑक्टोबरच्या या नऊ दिवसांमध्ये २४३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनावर मात करणारया रुग्णांचे प्रमाण ८६ टक्क्यांच्यावर पोहोचले आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला असला तरी मृत्यूचे सत्र कायम असल्याने चिंताही आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण घटले असले तरी बेफिकिरी करून चालणार नाही, उशिरा उपचार घातक ठरू शकतात, गंभीर समस्या उद्भगवू शकतात. त्यामुळे लक्षणे दिसताच पाच दिवसांच्या आत रुग्णांनी चाचणी करून उपचारास सुरुवात करावी. कोणताही आजार अंगावर काढू नये, असे आवाहन डॉ. राजकुमार चौहान यांनी केले आहे.

शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सर्वोपचारमधून प्राप्त ११३ अहवालांमध्ये सातजण पॉझिटिव्ह आढळले असून, निगेटिव्ह आलेल्या १०६ जणांना दिलासा मिळाला आहे. पॉझिटिव्ह सात जणांमध्ये चार महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे. त्यामध्ये दिग्रस ता. पातूर, व्याळा ता. बाळापूर, जीएमसी क्वॉर्टर, राजीव गांधी नगर, जीएमसी, कोठारी नगर व निंबा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी तीन पुरूषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये निंभोरा येथील ५६ वर्षीय पुरुष, फिरदोस कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष आणि तेल्हारा येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. काल रात्री रॅपिड अँटीजेन टेस्टच्या अहवालात १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या ७७६० तर मयतांची संख्या २५२ झाली आहे. डिस्चार्ज देण्यात आलेले रूग्ण ६६९५ असून, अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रूग्ण ८१३ आहेत.